वसतिगृह की कोंडवाडा ?

By Admin | Updated: July 22, 2014 00:17 IST2014-07-21T23:59:36+5:302014-07-22T00:17:06+5:30

वाशी : येथील मागासवर्गीय शासकीय मुलींच्या वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून, यासोबतच इमारत परिसरात घाणीचे साम्राज्यही पसरले आहे.

Kondvada of the hostel? | वसतिगृह की कोंडवाडा ?

वसतिगृह की कोंडवाडा ?

वाशी : येथील मागासवर्गीय शासकीय मुलींच्या वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून, यासोबतच इमारत परिसरात घाणीचे साम्राज्यही पसरले आहे. वसतिगृहातील मुलींच्या सर्व जागा भरल्यानंतर येथे अभ्यासालाही जागा पुरत नाही. तसेच सर्वत्र अंधार आणि कोंदट वातावरणामुळे हे वसतिगृह आहे की कोंडवाडा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
वाशी येथे मागासवर्गीय मुलींसाठी समाजकल्याण विभागामार्फत चालविले जाणारे निवासी वसतिगृह सध्या भाड्याच्या इमारतीमध्ये चालू आहे. प्रतिनिधीने या वसतिगृहाला भेट दिली असता अत्यंत कोंदट वातावरणात मुलींना येथे रहावे लागत असल्याचे दिसून आले. इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून तळमजल्यावरही स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. मुलींना निवासासाठी उपलब्ध असलेल्या खोल्यांमध्येही पुरेसा प्रकाश येत नसल्याचे दिसते. त्यामुळे अंधाऱ्या वातावरणात दमट हवामानात मुलींना रहावे लागत आहे. या वसतिगृहात दरवर्षी ६५ ते ७० मुलींना प्रवेश दिला जातो. सध्या येथे ३४ मुली राहत असून, प्रवेश प्रक्रिया चालू आहे. शिवाय वसतिगृहात स्वतंत्र अभ्यासिकेची सोय नाही. त्यामुळे सर्व जागा भरल्यानंतर मुलींना अभ्यासालाही जागा मिळत नाही. वसतिगृहात पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. सध्या येथे ग्रामपंचायतीचे नळ कनेक्शन घेण्यात आले असून, त्याद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर मुलींना दिवस ढकलावे लागत आहेत. ते पाणी अपुरे पडत असल्याचेही काही विद्यार्थिनींनी सांगितले. (वार्ताहर)
गृहपालाचे पद रिक्त
या वसतिगृहातील गृहपालाचे पदही गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. सध्या उस्मानाबाद येथील समाजकल्याण अधिकारी कार्यालयातील लिपिक थोरात यांच्याकडे येथील गृहपालाचा पदभार सोपविण्यात आला आहे. ते आठवड्यातून दोन दिवस याठिकाणी येतात. येथील समस्यांबाबत थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, समाजकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसरी इमारत पाहिलेली असून, कांही दिवसातच सदरील वसतिगृह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होणार आहे.

Web Title: Kondvada of the hostel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.