प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

By Admin | Updated: June 23, 2014 00:24 IST2014-06-22T22:31:13+5:302014-06-23T00:24:21+5:30

शिरूर अनंतपाळ : तालुक्याच्या आरोग्याचा भार केवळ दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे; परंतु या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात डझनभर पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला.

Knowledge of Primary Health Center | प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

शिरूर अनंतपाळ : तालुक्याच्या आरोग्याचा भार केवळ दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे; परंतु या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात डझनभर पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, पाच वर्षांपासून स्त्री परिचराविना प्रसूती विभाग सुरू असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रास ‘समस्येचा’ विळखा पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्याची निर्मिती होऊन चौदा वर्षे उलटली आहेत. तरीही येथे ग्रामीण रुग्णालय सुरू झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा भार साकोळ आणि शिरूर अनंतपाळ येथील आरोग्य केंद्रावर आहे. परंतु, या दोन्ही आरोग्य केंद्रांत गेल्या पाच वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या डझनभर रिक्त जागा भरल्या नसल्याने रुग्णसेवा रामभरोसे सुरू आहे. प्रसूती विभागासारखा अत्यंत महत्त्वाचा विभाग पाच वर्षांपासून हंगामी अप्रशिक्षित महिलेवर सुरू आहे.
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, डाटा एन्ट्री आॅपरेटर अशी अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णसेवा देण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, आरोग्य केंद्रास समस्यांचा विळखा पडला असल्याने डॉक्टरांनाच कर्मचारी, परिचर अशा वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागत आहेत.
डझनभर पदे रिक्त...
शिरूर अनंतपाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सहाय्यक, दोन आरोग्य सेविका, दोन आरोग्य सेवक, शिपाई, स्त्री परिचर, औषध निर्माण अधिकारी अशी दहा पदे रिक्त आहेत. तर साकोळ अंतर्गत एक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तीन कंत्राटी कर्मचारी असे दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळून डझनभर पदे रिक्त आहेत. परिणामी, रुग्णसेवा कोलमडली आहे.
याबाबत येथील प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी देवंगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागेचा अहवाल जिल्हा परिषदेस कळविण्यात आला असून, त्या लवकरच भरल्या जातील, असे सांगण्यात आल्याचेही डॉ. देवंगरे यांनी सांगितले.

Web Title: Knowledge of Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.