संतांमुळेच ज्ञानाची दालने खुली

By Admin | Updated: July 28, 2014 00:55 IST2014-07-27T23:54:07+5:302014-07-28T00:55:56+5:30

लातूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजनांसाठी ज्ञानाची दारे बंद केली होती. प्रस्थापितांनीच ज्ञानसंग्रह करून इतरांना त्यापासून वंचित ठेवले होते.

Knowledge gains open due to saints | संतांमुळेच ज्ञानाची दालने खुली

संतांमुळेच ज्ञानाची दालने खुली

लातूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजनांसाठी ज्ञानाची दारे बंद केली होती. प्रस्थापितांनीच ज्ञानसंग्रह करून इतरांना त्यापासून वंचित ठेवले होते. मात्र संतांनी ज्ञानाची केंद्र सर्वांसाठी खुली केली. त्यामुळे परिश्रम करणारी माणसं ज्ञानकेंद्रित झाली, असा सूर अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या रविवारी झालेल्या परिसंवादात निघाला.
दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित साहित्यिकांचे संमेलन सुरू आहे. रविवारी ‘प्रबोधनामध्ये संत साहित्याचे योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी प्रा. रतनलाल सोनग्रा होते. डॉ. सुरेखा आडगावकर, प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे यांनी या विषयाची मांडणी केली.
यावेळी बोलताना डॉ. सुरेखा आडगावकर म्हणाल्या, संतांनी जनमानसांतील विवेक प्रज्वलित केला. समाजातील देव-धर्माच्या घटनांकडे डोळसपणे पहायला शिकविले. समाजातील प्रचलित रुपकांचा वापर करून मिळविलेले ज्ञान सामान्य माणसांच्या गळीही उतरविले. या संत साहित्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. संतांच्या विचारांची शिदोरी मानव कल्याणासाठी महत्वाचीच असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले, समाजातील वाईट चालीरीती, परंपरा यावर पहिल्यांदा प्रहार संतांनी केला. ज्ञानाची दारेही खुली करून दिली. महात्मा बसवेश्वर, महात्मा गौतम बुद्ध हेही संतच आहेत. त्यांनी आयुष्यभर सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून त्याच्या कल्याणाचा विचार केला. क्रांती, भ्रांती व शांतीचा दुवा म्हणजे संत साहित्य आहे.
सूत्रसंचालन डॉ. सुषमा गोमारे यांनी केले. यावेळी नवोदित साहित्यिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
प्रस्थापितांकडून शोषण...
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले, प्रस्थापित समाज व धर्मव्यवस्थेने बहुजनांना ज्ञान नाकारले होते. ज्ञानाच्या जोरावर प्रस्थापितांनी लोकांचे शोषण केले. मात्र संतांनी हे ज्ञान सर्वांसाठी खुले केले. संतांमुळेच ज्ञानाचे केंद्र परिश्रम करणाऱ्या माणसांची केंद्र झाली. ज्ञानदानाचे हे कार्य संतांनी केले नसते, तर ज्ञानाची मक्तेदारी मूठभरांच्याच हाती राहिली असती. धर्माचा वेगळा अर्थ लावून हे ज्ञान नाकारले होते. परंतु, संत साहित्याचा उदय झाला आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली झाली, असेही प्रा. सोनग्रा यावेळी म्हणाले.

Web Title: Knowledge gains open due to saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.