भाजीपाला महागल्याने कीचन बजेट कोलमडले
By Admin | Updated: July 23, 2014 00:30 IST2014-07-22T22:47:19+5:302014-07-23T00:30:32+5:30
कडा : येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे खरेदीसाठी आलेल्या गृहिणींचे कीचन बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

भाजीपाला महागल्याने कीचन बजेट कोलमडले
कडा : येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे खरेदीसाठी आलेल्या गृहिणींचे कीचन बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.
आष्टी तालुक्यातील कडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ आहे. यामुळे कडा येथे परिसरातील डोंगरगण, खिळद, देवळाली, धानोरा यासह आष्टी व नगर परिसरातील काही व्यापारी, शेतकरी येथे भाजीपाला विक्रीसाठी आणतात. कडा शहरात सर्वात मोठा बाजार भरत असल्याने येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते.
पावसाळा सुरू होऊन गेल्या दीड महिन्यात पाऊसच पडला नसल्याने याचे परिणाम बाजारावरही दिसून येऊ लागले आहेत. नदी- नाले, तलाव कोरडेठाक पडल्याने चक्क पाणी विकत घ्यायची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. शेतकऱ्यांचेही सध्या हाल सुरू आहेत. जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नसल्याने भाजीपाल्यासह इतर पिकांचा तर प्रश्नच येत नाही. तालुक्यात अशी दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने बाजारावर याचा मोठा परिणाम झाला आहे.
कडा शहरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्याने बाजारात सर्रास भाज्यांचे ढिगारे दिसून येत असत. मात्र सध्या शेतकऱ्यांकडे भाजीपाला नसल्याने बाजारातील भाज्यांची आवक कमालीची घटली आहे. यामुळे भाजीपाल्यांची महागाई ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या टोमॅटो ६० रुपये किलो, कोबी ४० रुपये किलो, पत्ता कोबी ६० रुपये किलो, बटाटे ३० रुपये किलो, वांगे २० रुपये किलो, मेथी जुडी १५ रुपये, पालक १० रुपये, कोथिंंबीर जुडी १० रुपये यासह इतरही भाजीपाल्याचे दर १०० रुपये किलो प्रमाणे आहेत.
भाजीपाला महागल्याने १०० ते १५० रुपयांमध्ये लागणारा आठवड्याचा भाजीपाला आता ३०० रुपयांपर्यंत गेल्याचे जगन्नाथ भगत यांनी सांगितले. तर भाजीपाल्याचे विक्रेते नवनाथ तळेकर म्हणाले, यावर्षी अद्यापही पाऊस नसल्याने भाजीपाल्याच्या किमतीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
भाजीपाल्याच्या महागाईची सर्वाधिक झळ महिलांना बसल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांचे कीचन बजेटही कोलमडले आहे. कडा येथे बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर महिला येत असतात. दर आठवडी लागणाऱ्या पैशांच्या प्रमाणात महिलांनी बाजारासाठी पैसे आणले होते. मात्र भाजीपाल्याचे भाव प्रचंड वाढल्याने महिलांना पुरेशी भाजीपाल्याची खरेदीही करता आली नाही. यामुळे काही महिला हिरमुसल्याचे दिसून आले.(वार्ताहर)
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
वांजरवाडा : अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या तर काहींचे खत व बियाणे घरीच आहे़ सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यास आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी तालुका विकास संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांकडे सोमवारी केली आहे़
वांजरवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.