जोगेश्वरीतून दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:20+5:302021-01-08T04:08:20+5:30
जोगेश्वरी परिसरात इयत्ता नववीत शिक्षण घेणारी १५ वर्षीय मुलगी व तिची बारावीत शिक्षण घेणारी १७ वर्षीय मैत्रीण या ...

जोगेश्वरीतून दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण
जोगेश्वरी परिसरात इयत्ता नववीत शिक्षण घेणारी १५ वर्षीय मुलगी व तिची बारावीत शिक्षण घेणारी १७ वर्षीय मैत्रीण या दोघी रविवारी (दि.३) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेल्या आहेत. या दोघी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी परिसरात सर्वत्र त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या दोघी कोठेही मिळून न आल्याने या दोघींचे अपहरण झाल्याची तक्रार पालकांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
---------------------
विषारी औषध सेवन केलेल्या महिलेचा मृत्यू
वाळूज महानगर : विषारी औषध सेवन केलेल्या एका २२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रविवारी (दि.३) सिडको वाळूजमहानगरातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. यासमीन असिफ शेख (वय २२ रा.तलवाडा ता.गेवराई) या महिलेने राहत्या घरी शनिवारी (दि.२) दुपारी ३ वाजेच्या सुमारास फवारणीचे औषध सेवन केले होते. हा प्रकार लक्षात येताच यास्मीन शेख हिस बेशुद्धावस्थेत सिडको वाळूजमहानगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास यासमीन शेख यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
---------------------
घाणेगावातून विवाहिता बेपत्ता
वाळूज महानगर : जोगेश्वरीतून ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. सोनाली योगेश दीक्षित ही महिला २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली. सर्वत्र शोधाशोध घेऊनही ही बेपत्ता महिला कुठेही मिळून आली नाही. याप्रकरणी सोनाली हिचे पती योगेश दीक्षित यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
फोटो क्रमांक- सोनाली दीक्षित (बेपत्ता)
----------------------------
बजाजनगरात विजेत्यांचा सत्कार
वाळूज महानगर : बजाजनगरातील संत सावता माळी मित्रमंडळातर्फे स्व.भैरोमल तनवाणी विद्यालयात आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या हिताक्षी चौधरी, कांचन बोचरे, श्रीपाद कुलकर्णी, सार्थक काकडे तर चित्रकला स्पर्धेत सौरभ कांदे, आदित्य दिघुळे, ऋषीकेश वर्पे, सानिका पाटील, स्वप्निल शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हनुमान भोंडे, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, अशोक लगड, राजेंद्र माने, पंडित नवले आदींची उपस्थिती होती.
-------------------------
पंढरपुरात मंदिरासमोर वाहनांची गर्दी
वाळूज महानगर :पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासमोर काळी-पिवळीसह इतर वाहने उभी राहत असल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मंदिरासमोर रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात असल्याने दररोज सकाळी व सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या या वाहनधारकांविरुध्द कारवाई करण्याची मागणी भाविकांतून होत आहे.
------------------