पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण; वडगावच्या सरपंचासह ६ जणांविरुद्ध सिल्लोडमध्ये तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:32 IST2018-04-30T15:31:11+5:302018-04-30T15:32:50+5:30
अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करूनये म्हणून वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सरपंच महेश भोंडवे यांनी साथीदारांसह ग्रा.पं. सदस्या वैशाली जिवरग व त्यांचे पती काकाजी जिवरग यांना पिस्तूलचा धाक दाखूवन सिल्लोडमधून अपहरण केल्याची तक्रार गजानन जिवरग यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात दिली आहे.

पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण; वडगावच्या सरपंचासह ६ जणांविरुद्ध सिल्लोडमध्ये तक्रार
सिल्लोड-वाळूज महानगर : अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करूनये म्हणून वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सरपंच महेश भोंडवे यांनी साथीदारांसह ग्रा.पं. सदस्या वैशाली जिवरग व त्यांचे पती काकाजी जिवरग यांना पिस्तूलचा धाक दाखूवन सिल्लोडमधून अपहरण केल्याची तक्रार गजानन जिवरग यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात दिली आहे.
वडगाव कोल्हाटी ग्रा.पं. चे सरपंच महेश भोंडवे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे यांच्यावर १२ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. २ मे रोजी त्या संदर्भात विशेष सभा बोलावली आहे. हे १२ सदस्य आठवडाभरापूर्वीच अज्ञातस्थळी सहलीवर गेले आहेत. यातील वैशाली जिवरग या पतीसह काही कामानिमित्त सिल्लोड येथे दीराकडे गेल्या होत्या. वैशाली जिवरग यांना गाठून त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करू नये म्हणून सरपंच भोंडवे, उपसरपंचाचा मुलगा राम पाटोळे व गिरणीवाला त्रिभुवन यांच्यासह अन्य तीन जणांनी जिवरग दाम्पत्याला पिस्तूलचा धाक दाखवून सिल्लोडमधील गजबजलेल्या टिळकनगरातून शनिवारी सायंकाळी अपहरण केले. या प्रकरणी गजानन जिवरग यांच्या तक्रारीवरून सिल्लोड पोलीस ठाण्यात वडगावचे सरपंच महेश भोंडवे, राम पाटोळे, त्रिभुवन व अन्य तीन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला,
तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव ...
भाऊ काकाजी जिवरग व वहिनी वैशाली जिवरग यांचे अपहरण झाल्याची तक्रार द्यायला गजानन जिवरग हे पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा शिवसेनेच्या एका नेत्याने पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार घेऊ नका, असे सांगितले. शिवाय तक्रारदार जिवरग यांच्यावरही दबाव टाकण्यात आला. घाबरलेले जिवरग दुपारी ठाण्यातून निघून गेले. सायंकाळी पुन्हा तक्रार द्यायला आले. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
सरपंचावर गोव्यातही गुन्हा
१५ दिवसांपूर्वीच महेश भोंडवे यांना विना परवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता सिल्लोड ठाण्यात पुन्हा अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांवर दबाव नाही
घटना शनिवारी संध्याकाळी घडली. तक्रारदार रविवारी दुपारी आला आणि अपूर्ण तक्रार देऊन निघून गेला. त्यानंतर रविवारी संध्याकाळी पुन्हा तक्रार दिली. तक्रार येताच गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांवर कुणाचा दबाव नाही. उशिरा तक्रार दिली म्हणून उशिरा गुन्हा दाखल झाला, चौकशीअंती सत्य समोर येईल, असे सिल्लोडचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले.