खुलताबाद - फुलंब्री राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:49+5:302021-02-05T04:09:49+5:30
सुनील घोडके खुलताबाद : खुलताबाद-फुलंब्री-पाल फाटा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असून, खुलताबाद शहरातील रस्त्याचे काम अरुंद, तर फुलंब्री ...

खुलताबाद - फुलंब्री राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दुजाभाव
सुनील घोडके
खुलताबाद : खुलताबाद-फुलंब्री-पाल फाटा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असून, खुलताबाद शहरातील रस्त्याचे काम अरुंद, तर फुलंब्री शहरातील काम वनवे (दोन पदरी) व सुंदर बनविले जात आहेत. या दोन्ही शहरांतील रस्त्यांच्या कामात असा दुजाभाव का, असा आरोप खुलताबादकरांनी केला आहे. याबाबत संबंधित विभागाकडून त्वरित न्याय दिला जावा, अन्यथा खुलताबाद येथील जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
खुलताबाद शहर हे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या सर्वपरिचित आहे. भद्रा मारुती मंदिर, औरंगजेबाची कबर, सूफी संतांचा दर्गा, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर, मिनी महाबळेश्वर म्हैसमाळ, सुलीभंजनचे दत्तधाम मंदिर यासह अनेक धार्मिक व पर्यटनस्थळे असल्याने तालुक्यात दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. दीड वर्षापासून खुलताबाद-फुलंब्री-पालफाटा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. ही कामे पूर्णत्वासदेखील गेली नाहीत, तोच रस्त्यांना तडे गेल्याचे समोर आले.
दरम्यान, खुलताबाद शहर व फुलंब्री शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दुजाभाव केला जात असल्याचे समोर आले आहे. दोन्ही शहरांतील रस्त्यांच्या कामाची तुलना केली असता फुलंब्री शहरातील रस्त्याचे काम सुंदर पद्धतीने केले जात आहे. रस्त्याचे रुंदीकरण करून दुभाजक टाकले आहे, तर खुलताबादेतील रस्त्याचे रुंदीकरण नियमानुसार झालेच नाही. अरुंद काम, दुभाजक न बनविताच कामे उरकली जात आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दोन्ही शहरांतील कामात भेदभाव केला गेल्याचा आरोप खुलताबादचे माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन यांनी केला, तसेच नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून, आंदोलनासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.
---------
वरिष्ठांनी सांगितले तर प्रस्ताव पाठवू
खुलताबाद-फुलंब्री राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कामात अंदाजपत्रकात तसे नमूद असले तरी मी याबाबत अंदाजपत्रक बघून घेतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुलताबाद शहरातील महामार्ग रस्त्याच्या कामात रुंदीकरण करण्यासाठी आदेश दिले, तर तसा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.
- एम. बी. सांगवीकर, कार्यकारी अभियंता, खुलताबाद-फुलंब्री-पाल फाटा राष्ट्रीय महामार्ग विभाग.
--------------
फोटो कॅप्शन : खुलताबाद व फुलंब्री शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कामात झालेला भेदभाव दर्शविणारी छायाचित्रे.