कचरा डेपोप्रकरणी सुरू खो-खोचा खेळ
By Admin | Updated: May 28, 2014 01:13 IST2014-05-28T00:45:53+5:302014-05-28T01:13:28+5:30
औरंगाबाद : महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कचरा डेपो आणि सफारी पार्कच्या जागा हस्तांतरणावरून खो-खो सुरू आहे.

कचरा डेपोप्रकरणी सुरू खो-खोचा खेळ
औरंगाबाद : महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कचरा डेपो आणि सफारी पार्कच्या जागा हस्तांतरणावरून खो-खो सुरू आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दोन दिवसांपूर्वी असे सांगितले की, कचरा डेपो व सफारी पार्कप्रकरणी मनपाकडून प्रस्ताव आलेला नाही. आज आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, पालिकेने प्रस्ताव दिलेला आहे. दोन्ही यंत्रणांमध्ये जागेप्रकरणी प्रस्तावाचा लपंडाव सुरू असल्यामुळे कोण खरे बोलत आहे, कोण खोटे हे कळायला मार्ग नाही. मनपा आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले, सफारी पार्क आणि कचरा डेपोसाठी मनपाने सुचविलेल्या जागांप्रकरणी विचार सुरू आहे, तसेच पालिकेने प्रस्ताव दिलेला आहे. मिटमिट्यात कचरा डेपोला विरोध वर्षाच्या सुरुवातीलाच मनपा पदाधिकारी आणि आयुक्तांनी मिटमिटा येथे १०० एकर जागेची पाहणी करून तेथे कचरा डेपो स्थलांतरित करण्याचे ठरविले; मात्र गावकर्यांच्या विरोधामुळे तो प्रस्ताव रखडला. त्यानंतर तीसगाव येथे कचरा डेपो स्थलांतरित करण्याबाबत नवीन प्रस्ताव चर्चेला आला; मात्र त्याचेही काही झालेले नाही. जागेबाबत अशी आहे अडचण मिटमिटा येथील गावकर्यांनी कचरा डेपोला विरोध केल्यामुळे ते प्रकरण थंडावले आहे, तर सफारी पार्कसाठी मनपाने जी जागा मागितली आहे, त्यासाठी लागणारे ३ कोटी रुपये शासनाला दिलेले नाहीत. प्राणिसंग्रहालय स्थलांतरित करण्यासाठी सफारी पार्कचा प्रस्ताव मनपाने तयार केला आहे. तीन वर्षांपासून सफारी पार्कवर चर्चा सुरू आहे, तर १० वर्षांपासून नारेगाव कचरा डेपोचे स्थलांतरण व्हावे यासाठी नागरिक आंदोलन करीत आहेत. दौलताबाद परिसरात ती जागा होती. त्यानंतर मिटमिटा परिसरात जागेची मागणी करण्यात आली. वर्षापूर्वी मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये सफारी पार्कचा प्रस्ताव जळाला. त्यामुळे नव्याने प्रस्ताव तयार करून शासनाकडे देण्यात आला. ३ कोटी रुपयांमध्ये १०० एकर जागा पालिकेला देण्याबाबत चर्चा सुरू आहे. आजवर त्या प्रकरणी काहीही निर्णय झालेला नाही.