मराठवाड्यात खरिपाचे नियोजन एप्रिलमध्येच
By Admin | Updated: April 15, 2016 01:49 IST2016-04-15T01:29:01+5:302016-04-15T01:49:33+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप हंगामाच्या आढावा बैठका २० एप्रिलपूर्वीच घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत

मराठवाड्यात खरिपाचे नियोजन एप्रिलमध्येच
औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप हंगामाच्या आढावा बैठका २० एप्रिलपूर्वीच घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विभागात दोन पिकांमध्ये कडधान्ये घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता तयार करण्यावर भर द्यावा, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दांगट यांनी बुधवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृषी अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यापूर्वी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मे महिन्यात खरीप आढावा बैठक घेण्यात येत होती. मात्र, यावेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एक महिना अगोदरच ही बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकत्रित आढावा घेतील.
आंतरपिकांची शेती करा
मराठवाड्यात एकूण क्षेत्रापैकी एकतृतीयांश क्षेत्रावर कापूस, एकतृतीयांश क्षेत्रावर सोयाबीन, तसेच इतर कडधान्ये घेण्यात येतात. तर उर्वरित क्षेत्रावर ज्वारी, मका, बाजरी, गहू, यासह इतर पिके घेतली जातात. या पार्श्वभूमीवर या बैठकीत दांगट यांनी आंतरपीक घेण्याच्या सूचना दिल्या. तुरीसोबत सोयाबीन, कापसासोबत मूग, उडीद घेण्यास शेतकऱ्यांना सांगावे असे ते म्हणाले. तसेच ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी उसाऐवजी ठिबकचा वापर करून तुरीचे, कापसाचे उत्पादन घ्यावे, असा पर्यायही सुचविला आहे, तसेच कृषी सहायकाच्या अंतर्गत दहा हेक्टरपर्यंत फलोत्पादन करण्यात यावे आणि त्यातही कोरडवाहू फळपिके असणाऱ्या बोर, सीताफळ,आंबा तसेच डाळिंबाला प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मार्केटिंगला प्राधान्य द्या
अॅग्रो प्रोसेसिंग तसेच मार्केटिंगच्या कंपन्या स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना यावेळी दांगट यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यासाठी एकाच भागात एक पीक घेतल्यास त्याचे मार्केटिंग करणे सोपे होते. त्यामुळे केवळ उत्पादन वाढविण्यावर भर देण्यासोबत शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळेल, यासाठीदेखील प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठवाड्यातदेखील मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.