गेल्या दहा शतकांतील शहराच्या स्थित्यंतराची साक्षीदार खाम नदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST2021-04-09T04:05:21+5:302021-04-09T04:05:21+5:30

प्रभुदास पाटोळे औरंगाबाद : शहराची धमणी म्हणून ओळखली जाणारी खाम नदी गेल्या १० शतकांत विविध शासकांच्या कारकिर्दीत शहरात झालेल्या ...

The Kham River has witnessed the transformation of the city over the last ten centuries | गेल्या दहा शतकांतील शहराच्या स्थित्यंतराची साक्षीदार खाम नदी

गेल्या दहा शतकांतील शहराच्या स्थित्यंतराची साक्षीदार खाम नदी

प्रभुदास पाटोळे

औरंगाबाद : शहराची धमणी म्हणून ओळखली जाणारी खाम नदी गेल्या १० शतकांत विविध शासकांच्या कारकिर्दीत शहरात झालेल्या स्थित्यंतराची आणि प्रगतीची साक्षीदार आहे.

मलिक अंबर यांनी १६१० साली खडकी गाव वसविल्याचे सांगितले जाते. मात्र तत्पूर्वी येथे राजतडाग (रॉयल लेक) नावाचे गाव होते. याचा उल्लेख कन्हेरी गुफेतील शिलालेखावर आहे. तसेच उज्जैन, महेश्वर, बुरहानपूर, अजिंठा, भोकरदन राजतडाग, प्रतिष्ठान (पैठण) मार्गे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावापर्यंतचा व्यापारी मार्ग राजतडाग येथून जात असल्याच्या नोंदी १०व्या शतकापर्यंत आहेत.

१६१० साली मलिक अंबरने खडकी गाव वसविले होते. त्यानंतर १६३३ला मलिक अंबरचा मुलगा फतेहखान राजा झाला. त्याने खडकीचे नाव फतेहनगर केले. त्यानंतर औरंगजेब बादशहाने फतेहनगरचे नाव खुजिस्ता बुनियाद ठेवले. कालांतराने याचेही नामांतर होऊन औरंगाबाद झाले जे आजपर्यंत (२०व्या शतकापर्यंत) तसेच आहे.

बिकानेरचे राजा करणसिंग यांना औरंगजेब बादशहाने कर्णपुरा, पदमपुरा आणि केसर सिंगपुरा ही खेडी भेट दिली. करणसिंग यांनी १६५८ला कर्णपुऱ्यात खाम नदीच्या तीरावर राजाचा महाल आणि राणीचा महाल बांधून १६६९पर्यंत वास्तव्य केले. (हा महाल आजही भग्नावस्थेत आहे) तेेथेच त्यांचे निधन झाले. त्यावेळी ‘चुरू’चे ठाकूर कुशलसिंह यांनी खाम नदीच्या तीरावर त्यांचा अंत्यविधी केला होता.

१२ ऑक्टोबर १६८३ला औरंगजेब बादशहा कर्णपुऱ्यात कर्णसिंहांच्या भेटीस गेले होते. तेथे जवळपास एक महिना राहून, १३ नोव्हेंबर १६८३ला बादशहा अहमदनगरच्या किल्ल्यात पोहोचले होते.

रशिया देशातील गजबदान (बुखारा) येथून आलेले सुफी संत बाबाशाह हजरत मुसाफिर खाम नदीच्या तीरावर वास्तव्यास होते. तेथेच १६२४ साली पानचक्कीचे बांधकाम सुरू झाले. क्रमाक्रमाने १७४४ ला पूर्ण झाले. बाबाशाह यांचे अनुयायी आणि इतर लोक पानचक्की परिसरातील पाण्याच्या हौदाखालील खामनदीच्या तीरावर नैसर्गिक वातानुकूलित भव्य दालनात उन्हाळ्यात वास्तव्यास असत. भविष्यात खाम नदीच्या पूर्वेला शहराभोवती ५२ दरवाजे आणि ५२ खिडक्या असलेला भव्य कोट आणि राजा-महाराजांच्या वास्तव्यासाठीच्या वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या इमारती विविध शासनकर्त्यांनी बांधल्या. पश्चिमेला सोनेरी महल, बीबी का मकबरा आणि पानचक्की आदी पर्यटनस्थळे आणि खाम नदीवर मकाई गेट, महेमूद गेट, बारापुल्ला गेट आणि दीर्घकाळानंतर लोखंडी पूल तयार झाला.

१८१९ला हैदराबादचे निजाम यांनी उस्मानपुऱ्यात सैन्याचा तळ (कॅन्टेन्मेंट) स्थापन केले. १८३६ साली तो तळ हर्सूल आणि बीबी मकबरा दरम्यान खाम नदीच्या तीरावर स्थलांतरित केला. शेवटी १८९०ला सध्या आहे तेथे छावणी परिषद स्थापन झाली.

१९व्या शतकात औरंगाबाद मिल, घाटी रुग्णालय आणि पानचक्कीपासून बारा पुलापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध महाविद्यालये स्थापन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात लोखंडी पुलापासून बनेवाडीपर्यंतचा परिसर बुलबाट म्हणून ओळखला जात असे. तेथे केवळ इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी आणि सायंकाळी फिरण्याची मुभा होती. भारतीय लोकांना तेथे जाता येत नसे. यावरून खाम नदीचे पाणी आणि वातावरण किती शुद्ध होते याची कल्पना येते.

Web Title: The Kham River has witnessed the transformation of the city over the last ten centuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.