खैरेंचे ते वक्तव्य भाजपाला झोंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:05 IST2021-09-23T04:05:36+5:302021-09-23T04:05:36+5:30
औरंगाबाद: भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला केंद्रशासनाकडून जिल्हानिहाय पैसा पुरविण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लातूर येथे केला. खैरेंचे ...

खैरेंचे ते वक्तव्य भाजपाला झोंबले
औरंगाबाद: भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला केंद्रशासनाकडून जिल्हानिहाय पैसा पुरविण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लातूर येथे केला. खैरेंचे ते वक्तव्य भाजपाला झोंबले असून, पलटवार करताना भाजपाचे आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी शिवसेनेने सरकारी तिजोरीतून काय कामे चालविली आहेत, याची कुंडली आमच्याकडे असून, त्याची चिरफाड करण्याचा इशारा बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
केंद्रात नव्याने वर्णी लागलेल्या मंत्र्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली. ही यात्रा काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सुमारे साडेचार कोटी रुपये दिले गेले. त्यातून मोठे बॅनर लावले. हा पैसा आला कुठून, आम्हालादेखील भाजपाची कुंडली काढावी लागेल, असा इशारा खैरे यांनी दिला.
खैरे यांच्या या वक्तव्यावर आ. निलंगेकर म्हणाले की, ज्यांनी आरोप केला, त्यांच्या पक्षप्रमुखांची भविष्यात अशा यात्रा निघाव्यात, अशी अपेक्षा असेल.
आ. सावे म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रेला स्थानिक कार्यकर्त्यांनीच हातभार लावला. त्यामुळे खैरे यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही.
शहराध्यक्ष केणेकर म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रा जनमाणसांनी काढलेली यात्रा आहे. शिवसेनेच्या कामाचे ऑडिट भाजपाने केले तर त्यांना पळता भुई थोडी होईल. शहरात त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमांना होणारा खर्च सरकारी तिजोरीतून होतो की, खासगीतून होतो, हे सर्वश्रुत आहे.