एक तर आम्हाला ठेवा; नाही तर आमदाराला ठेवा
By Admin | Updated: October 10, 2016 01:10 IST2016-10-10T00:55:00+5:302016-10-10T01:10:18+5:30
औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात तालुक्यातील सेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्र उपसले आहे.

एक तर आम्हाला ठेवा; नाही तर आमदाराला ठेवा
औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात तालुक्यातील सेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्र उपसले आहे. उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांपर्यंतच्या सुमारे ३०० पदाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी एक तर आम्हाला ठेवा, नाही तर आमदाराला पक्षात ठेवा, अशी भूमिका खा. चंद्रकांत खैरे यांच्यासमोर मांडली.
कन्नड मार्केट कमिटी, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण संघटना आमदाराच्या विरोधात जाणे हे घातक असल्यामुळे खा. खैरे यांनी शिवसैनिक बचाव करण्याचा पवित्रा घेतला आहे.
जाधव शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी कन्नडमधील सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र आघाडी स्थापन केली होती. ती आघाडी पालकमंत्री रामदास कदम यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेत विलीन करण्यात आल्याची घोषणा केली. त्या घोषणेनंतर आ. जाधव समर्थकांनी सोशल मीडियातून येणाऱ्या सर्व निवडणुकांत उमेदवार जाहीर करून टाकले. तालुक्यात शिवसेना उभी करणाऱ्यांना डावलून आ. जाधव यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केल्याने सर्व शिवसेना संघटना पदाधिकाऱ्यांचे पित्त खवळले. जाधव अरेरावीची भाषा करतात. शिवराळ भाषेत पदाधिकाऱ्यांना बोलतात, असा आरोप करीत पदाधिकाऱ्यांनी तातडीने रविवारी रेल्वेस्टेशन येथील खा. खैरे यांचे निवासस्थान गाठून राजीनामा देण्याची तयारी सुरू केली. \
आ.जाधव यांची भूमिका पक्षशिस्तीच्या विरोधात आहे. त्यांच्या विरोधात पूर्ण शिवसैनिक राजीनामा देण्यासाठी आले होते. नगराध्यक्षपद महिला ओबीसी प्रवर्गासाठी गेले, नाचनवेल या जि.प. सर्कलचे चार तुकडे झाले. त्यामुळे जाधव यांनी आघाडी शिवसेनेत विलीन केली, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. पालकमंत्र्यांनी आम्हाला अजून काहीही आदेश दिले नाहीत, असे असताना जाधव यांनी उमेदवार जाहीर करून टाकले हे पक्षात चालणार नाही.
शिवसैनिक सांभाळायचे आहे, पक्षप्रमुखांशी चर्चा करूनच तेथील निर्णय होईल. शिवसेना-भाजप युतीसाठी बोलणी सुरू असताना त्यांनी आघाडी स्थापन करून उमेदवारही जाहीर केले. पालकमंत्र्यांना त्यांनी काय सांगितले हे आम्हाला माहिती नाही, असे खा. चंद्रकांत खैरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
जुन्या पदाधिकाऱ्यांकडे निवडणुकांच्या अनुषंगाने व्यूहरचना नव्हती. त्यामुळे विकास आघाडी स्थापन केली; परंतु पालकमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आघाडी विलीन केली. तसेच पालकमंत्र्यांनी मला शिवसेनेचा आमदार असल्याने उमेदवारी जाहीर करण्याच्या सूचना केल्या. बंड करणाऱ्यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीदेखील नाही. त्यांची राजकीय अवकातही तपासली पाहिजे. पक्षाने सांगितल्याने आघाडी विलीन केली. त्यामुळे बदल करायचा असेल तर पक्षाने ठरवावे, असे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.