कृषि शिल्पाचा दुर्मिळ वापर असलेले कलिंदेश्वर
By Admin | Updated: August 4, 2014 00:48 IST2014-08-04T00:17:10+5:302014-08-04T00:48:52+5:30
जगदीश पिंगळे, बीड शिवालयाच्या स्थापत्य कलेत एक वेगळी शैली जपलेले बिंदूसरेच्या तीरावरील शिवालय म्हणजे कलिंदेश्वर होय़ या ठिकाणी कृषि शिल्पांचा दुर्मिळ वापर केल्याचे आढळून येते़

कृषि शिल्पाचा दुर्मिळ वापर असलेले कलिंदेश्वर
जगदीश पिंगळे, बीड
शिवालयाच्या स्थापत्य कलेत एक वेगळी शैली जपलेले बिंदूसरेच्या तीरावरील शिवालय म्हणजे कलिंदेश्वर होय़ या ठिकाणी कृषि शिल्पांचा दुर्मिळ वापर केल्याचे आढळून येते़
बिंदूसरा नदीला कलिंद कन्या हे प्राचीन नाव होते़ या नदीच्या तीरावर पालीजवळ नागनाथ, बीड शहरालगत सोमेश्वर, कनकालेश्वर आणि कलिंदेश्वर अशी चार शिवालये आहेत़ बीडचे इतिहास अभ्यास डॉ़ सतीश साळुंके लोकमतशी बोलताना म्हणाले की, बहमनी काळातील हे मंदिर शिल्पकलेचा एक अजोड नमूना आहे़ शिल्पांचा उठावदारपणा पर्यटकांच्या तातडीने नजरेत भरतो़ त्यांच्यावर राजस्थानी शैलीचा प्रभाव येथील शिल्पकलेत आढळून येतो़ हत्तीच्या अंबारीचे शिल्प आकर्षक आहे़ बाह्य स्तंभही इंडो-इस्लामिक स्थापत्य कलेची ओळख करणारी आहेत़ मंदिराच्या गाभाऱ्यात वरच्या बाजूला हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेले कमळ उलटे लावलेले आहे़ शिवाय अष्टकोनी नक्षीकाम हे ही एक वैशिष्ट्य आहे़ दोन कमानीच्या मध्ये विविध धान्याच्या कणसांची शिल्पे आहेत़ अत्यंत दुर्मिळ अशी कृषि संस्कृतीची परिचय करुन देणारी ही शिल्पे कदाचित महाराष्ट्रातील शिवालयांमध्ये फक्त बीडच्या कलिंदेश्वरात आढळून येत असावी, असे डॉ़ साळुंके म्हणाले़
या मंदिरामध्ये पशुपक्ष्यांचीही शिल्पे आहेत़ या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख आहे़ बीड शहरातील इतर शिवालयांची प्रवेशद्वारे पश्चिममुखी आहेत़ साधारण चौदाव्या ते पंधराव्या शतकातील हे मंदिर बहमनीच्या राजवटीत बांधलेले आहे़ एक शिल्पकलेचा अजोड नमुना बीड शहरात असूनही अनेकदा पर्यटकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ या मंदिराची आणखी देखभाल केल्यास हे मंदिर निश्चितच महाराष्ट्रातील एक आकर्षक शिवालय ठरेल़