कळंबला चोराखळीतून पाणी
By Admin | Updated: April 14, 2016 01:03 IST2016-04-14T00:57:48+5:302016-04-14T01:03:18+5:30
कळंब : शहराला चोराखळी धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून तीव्र

कळंबला चोराखळीतून पाणी
कळंब : शहराला चोराखळी धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या कळंबकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा मिराताई चोंदे व नगरसेवकांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन २५ टँकरची मागणी केली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
मांजरा धरण कोरडेठाक पडल्यानंतर कळंब शहराचा पाणीप्रश्न तीव्र बनला आहे. सध्या शहरात दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, जिल्हा प्रशासनाने शहर परिसरातील सहा किमी अंतरातूनच पाणी साठविण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यामुळे परिसरातील स्त्रोत शोधताना पालिकेची दमछाक झाली. या स्त्रोतातूनही मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम टँकरच्या खेपांवर झाला. पर्यायाने नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजनही कोलमडून शहरवासियांना कधी विकतच्या पाण्यावर तर कधी विंधन विहिरीच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली.
शहरात सध्या लोकसहभागातून घेतलेल्या काही विंधन विहिरींवर तसेच काही नागरिकांनीपुढाकार घेऊन उपलब्ध करून दिलेल्या विंधन विहिरीवरून थोडाफार पाणीपुरवठा होतो आहे. नगर परिषद काही ठराविक भागात पाणीपुरवठा करीत असून, दग नगर, कल्पना नगर, बाबाा नगर, पुनर्वसन सावरगाव या भागात नागरिकांची पाण्यासाठी मोठी धावपळ होताना दिसते. शासकीय कार्यालये असलेल्या भागातही पाण्यासाठी नागरिकांनी दिवस-रात्र एक केली आहे. लोकसहभागातून कामे होत असल्याने पालिकाही स्वत:हून काही विंधन विहिरी घेईल, अशी अपेक्षा होती. परंतु, विशेष सभेत मंजूर करून घेतलेल्या १९ विंधन विहरिीबाबत त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.
याच अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली. यावेळी कळंब शहराचे स्थानिक पाणी स्त्रोत कमी पडत असल्यामुळे चोराखळी येथील तलावातून पाणी द्यावे व २२ हजार लिटर क्षमतेचे २५ टँकर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. २५ टँकरच्या रोज दोन खेपा गृहीत धरल्यास कळंब शहर व डिकसळच्या मिळून ४० हजार लोकसंख्येस दर मानसी प्रतीदिन ३० लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा होवू शकतो, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पालिका मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख व उपविभागीय अधिकारी यांना चोराखळी येथे जावून स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच अहवाल मिळाल्यानंतर तात्क़ाळ वीस हजार लिटर क्षमतेच्या दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासनही दिले. दरम्यान, रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने वीस टँकर मंजूर केले अूसन, यामुळे शहराची पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात नगराध्यक्षा मिराताई चोंदे, उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, नगरसेवक पांडुरंग कुंभार, श्रीधर भवर, संजय मुंदडा, अतुल कवडे, वनमाला वाघमारे, अतिया सलिम शेख, अनिता लोमटे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख जगन्नाथ बावळे आदींचा समावेश होता.