‘कलाग्राम’ उजळले
By Admin | Updated: October 17, 2016 01:16 IST2016-10-17T00:54:56+5:302016-10-17T01:16:24+5:30
औरंगाबाद : प्रतिभावंत हस्तकलाकारांच्या कलेने ‘कलाग्राम’ उजळले. चित्रकारांनी रेखाटलेल्या विविध चित्रांनी सारे भारावून गेले होते.

‘कलाग्राम’ उजळले
औरंगाबाद : प्रतिभावंत हस्तकलाकारांच्या कलेने ‘कलाग्राम’ उजळले. चित्रकारांनी रेखाटलेल्या विविध चित्रांनी सारे भारावून गेले होते. काही चित्रकार चित्र काढण्यात एवढे तल्लीन झाले होते की, त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. हस्तकलेच्या चाहत्यांसाठी येथील प्रदर्शन पर्वणीच ठरले.
वेरूळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त ‘कलाग्राम’ मध्ये भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात हस्तकलाकारांची मांदियाळीच भरली आहे. प्रत्येक स्टॉलवर मांडण्यात आलेल्या कलाकृतीतून त्या कलाकाराच्या प्रतिभेची चुणूक दिसून येत आहे. आज रविवार असल्याने अनेकांनी आवर्जून या कलाग्रामला भेट दिली. प्रत्येक कलाकाराची कल्पकता, चित्र रेखाटण्याची शैली वेगवेगळी होती. समाज, निसर्ग, ऐतिहासिक वास्तूंकडे पाहण्याचा चित्रकारांचा दृष्टिकोन चित्रातून बघण्यास मिळत होता. सोमवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.
कलाग्राममधील स्टॉलमध्ये एक स्टॉल असा आहे जिकडे पाहावे तिकडे व्यंगचित्रच आपणास पाहण्यास मिळत आहेत. बहुतांश व्यंगचित्रातून सामाजिक विषय हाताळण्यात आले आहेत. या व्यंगचित्रातून नेमकेपणे समाजाच्या मर्मावर बोट ठेवण्यात आले आहे. व्यंगचित्रकार जी. ए. बारसकर यांनी ही व्यंगचित्रे काढली आहेत. अनेक चित्रप्रेमी या स्टॉलला भेट दिली.
बांगड्या, त्यावर ज्वेलरी डिझाईन कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक कलाग्राममध्ये बघण्यास मिळत आहे. लाखेच्या बांगड्या तयार करणारा मणियार परिवार येथे आपणास हे प्रात्यक्षिक दाखवत आहे. तरुणी व महिला वर्गात येथे ‘मस्तानी कड’ प्रिय झाले आहे. या मस्तानी कडावर स्टोन, मोती कसे लावले जातात हे नसीमबानू मणियार या दाखवत आहेत.
चित्रकारांवर वेरूळ-अजिंठा लेणीतील शिल्पांचा किती प्रभाव आहे ते कलाग्राममधील चित्र पाहिल्यावर लक्षात येते. चित्रकार नंदकुमार जोगदंडे यांनीही लेणीतील शिल्प चित्रात साकारले आहेत. काही चित्र ‘निराकार’ आहेत. या निराकार चित्रातून त्यांनी बराच काही ‘अर्थ’ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हेच त्यांच्या चित्राचे वैशिष्ट्ये ठरत आहे.
कलाग्राममध्ये कलाप्रेमींना मधुबन पेंटिंग बघण्यास मिळत आहे. मधुबन शैलीतील चित्र काढणारे चित्रकार राज्यात कमीच आहेत. त्यातील एक तृप्ती कटनेश्वरकर या आहेत. त्यांनी स्वत: रेखाटलेल्या मधुबन पेंटिंग या प्रदर्शनात मांडल्या आहेत. मधुबनी सूक्ष्म चित्र काढताना चित्रकारामध्ये खूप संयम असायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.