कड्याचे ३३ के.व्ही. उपकेंद्रच अंधारात !
By Admin | Updated: September 23, 2014 23:42 IST2014-09-23T23:35:11+5:302014-09-23T23:42:33+5:30
कडा: आष्टी तालुक्यातील बारा गावांना विद्युत पुरवठा करणारे कड्याचे ३३ के.व्ही. विद्युत केंद्रच अंधारात असल्याचे दिसून येत आहे.

कड्याचे ३३ के.व्ही. उपकेंद्रच अंधारात !
कडा: आष्टी तालुक्यातील बारा गावांना विद्युत पुरवठा करणारे कड्याचे ३३ के.व्ही. विद्युत केंद्रच अंधारात असल्याचे दिसून येत आहे. या कार्यालयाची मोठी दुरवस्था झाली असून सुविधांचा अभाव आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांमधून केला जात आहे.
कडा ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत १२ गावांचा समावेश होतो. यामध्ये टाकळी अमिया, रूई, खराटे वडगाव, आनंदवाडी, केरूळ, कडा, खाकाळवाडी, शेलारवाडी, मोरेवाडी, शेरी खुर्द, शेरी बु. आदी गावांचा समावेश आहे. या गावांना सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा यासाठी महावितरण कार्यालयाने ३३ के.व्ही. उपकेंद्र उभे केले. या उपकेंद्रात बारा कर्मचारी, चार आॅपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणच्या कार्यालयाची दयनीय अवस्था निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयात बसताना येथील कर्मचारी जीव मुठीत धरून बसत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये कार्यालयाला गळती लागते. त्यामुळे बसण्यासाठीची जागा राहत नाही. दरवाजे, खिडक्या कार्यालयाला नसल्याने विविध अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागतो.
कार्यालयाच्या चोहूबाजूंनी अडचण असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात गवत, बाभळींचा विळखाही पडल्याने येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
सुविधांचा अभाव
या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोयी- सुविधा पुरविल्या जात नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची सोयही नाही. तसेच शौचालय उपलब्ध नसल्याने उघड्यावर शौचास बसण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. यामध्ये महिलांची कुचंबना होत आहे.
या उपकेंद्रांतर्गत बारा गावांना वीजपुरवठा करून गाव उजेडात ठेवण्याचे काम केले जाते. मात्र येथील कर्मचाऱ्यांनाच सोयी सुविधा मिळत नसल्याने व उपकेंद्रातच वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने हे कार्यालयच अंधारात असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. वरिष्ठांच्या या दुर्लक्षामुळे येथील कर्मचाऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे.
येथील कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पुरवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत आष्टी महावितरणचे अधिकारी राहूल जायभाये म्हणाले, या ठिकाणचा प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. (वार्ताहर)