जिन्सीत ४ मोटारसायकली जाळल्या
By Admin | Updated: July 12, 2017 00:48 IST2017-07-12T00:45:32+5:302017-07-12T00:48:33+5:30
औरंगाबाद : जिन्सी पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावरील खासगेट लगत उभ्या चार दुचाकींना माथेफिरूंनी आग लावल्याची घटना मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान घडली.

जिन्सीत ४ मोटारसायकली जाळल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिन्सी पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावरील खासगेट लगत उभ्या चार दुचाकींना माथेफिरूंनी आग लावल्याची घटना मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान घडली. जळण्याचा वास आणि स्फोटाच्या आवाजाने जागे झालेल्या एका नागरिकाने गॅलरीतून हे आगीचे दृश्य पाहिले. तसेच तीन अज्ञात समाजकंटक अंधारात पळून जाताना दिसले. त्या नागरिकाने घाईघाईने खाली उतरून गाड्या विझविण्यासाठी प्रयत्न केला.
घटनास्थळी नवीन आगपेटी पडलेली आढळली. तसेच त्याच गल्लीतून तिघे अज्ञात पळत असल्याचे दिसले. रात्री अंधार असल्याने काही समजण्याच्या आत अज्ञातांनी पळ काढला. १० जुलैच्या रात्री आणि ११ जुलैच्या पहाटे रात्री ३ ते ४ च्या दरम्यान कोणीतरी माथेफिरूने गाड्यांना आग लावून पळ काढला. राशिद खान हाफिजउल्ला खान यांची (एम.एच.२० एल.ए. २५९४), सय्यद मेराज अली सय्यद मकसूद अली यांची (एम.एच-२०,सी. एफ-६६४४़), (एम.एच-२० बी.एस-६६४४), मोहम्मद अय्युब मोहम्मद सुभान (एम.एच-२० क्यू ४३२७) यांच्या गाड्या आगीत भस्मसात झाल्या. हा प्रकार घडत असताना हाकेच्या अंतरावरील जिन्सी पोलीस ठाणे बेखबर होते. रात्री गस्तीवरील चार्ली पोलिसांनी ही घटना पाहिली. नंतर त्यांनी जिन्सी पोलिसांना संपर्क साधून माहिती दिल्यावर ते खडबडून जागे झाले. तोपर्यंत दुचाकीधारकांनीच गाड्यांची आग विझविली. जिन्सी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच कंट्रोल रूमला माहिती कळाल्याने जवळपास पाच पोलिसांच्या गाड्या भरून फौजफाटा दाखल झाल्याने घटनास्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. जिन्सी पोलिसांनी गाड्यांचा व घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.