जंगल सफारी सुरू होण्यापूर्वी वाघांची संख्या २५ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:02 IST2020-12-27T04:02:26+5:302020-12-27T04:02:26+5:30

सिद्धार्थ उद्यान मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशातील नागरिकांसाठीचे आकर्षणाचे केंद्र आहे. शाळकरी मुलांसह लाखो पर्यटक प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. मात्र, अपुरी जागा, ...

Before the jungle safari starts, the number of tigers will be 25 | जंगल सफारी सुरू होण्यापूर्वी वाघांची संख्या २५ होणार

जंगल सफारी सुरू होण्यापूर्वी वाघांची संख्या २५ होणार

सिद्धार्थ उद्यान मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशातील नागरिकांसाठीचे आकर्षणाचे केंद्र आहे. शाळकरी मुलांसह लाखो पर्यटक प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. मात्र, अपुरी जागा, देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेकडून झालेले दुर्लक्ष यामुळे प्राणिसंग्रहालय अडचणीत आले होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दोन वर्षांपूर्वी प्राणिसंग्रहालयाचा दर्जा रद्द करण्याचा इशारा महापालिकेला दिला होता. प्राधिकरणाला विनंती केल्यानंतर काही अटी-शर्तींसह परवानगी पुन्हा बहाल करण्यात आली. येथील प्राण्यांना आता मिटमिटा भागातील १५० एकरमधील जंगल सफारीमध्ये हलविण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीतून सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये खर्च केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने अंतिम केल्यामुळे लवकरच जंगल सफारीच्या कामाला सुरुवात होईल. याठिकाणी वाघ, बिबट्यांसह इतर हिंस्र प्राणी मोकळ्या वातावरणात असतील. प्राण्यांना नैसर्गिक वातावरण मिळावे यासाठी प्राधिकरणाचे आणि महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना जाळीदार वाहनातून जंगल सफारीचा आनंद घेता येईल. त्यासाठी प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. तशा सूचना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केल्या असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले. जंगल सफारी सुरू होईपर्यंत वाघांची संख्या २५ एवढी होऊ शकते, असे नाईकवाडे यांनी नमूद केले.

चौकट

नवीन बछड्यांना ठेवण्यासाठी जागाच नाही

राज्यातील इतर प्राणिसंग्रहालयांचा विचार करता औरंगाबादेत वाघांचा जन्मदर सर्वाधिक आहे. मात्र, प्राणिसंग्रहालयात सध्या आहेत त्या प्राण्यांसाठीच जागा अपुरी आहे. त्यामुळे वाघ-वाघिणीला काही काळ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जात होते. आता जंगल सफारी होत असल्याने त्यांना अधिवासात सोडले जात आहे. गतवर्षी दोन वाघ केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मुंबईला देण्यात आले होते.

Web Title: Before the jungle safari starts, the number of tigers will be 25