जुगलबंदीचा दुसरा ताराही निखळला...
By Admin | Updated: June 4, 2014 01:31 IST2014-06-04T01:06:39+5:302014-06-04T01:31:44+5:30
हणमंत गायकवाड , लातूर लातूर असो की परळी. कित्येकदा जुगलबंदीने बहरलेल्या सभा, समारंभ अन् सोहळ्यात हास्य फवार्यांनी श्रोते चिंब होत असंत.

जुगलबंदीचा दुसरा ताराही निखळला...
हणमंत गायकवाड , लातूर लातूर असो की परळी. कित्येकदा जुगलबंदीने बहरलेल्या सभा, समारंभ अन् सोहळ्यात हास्य फवार्यांनी श्रोते चिंब होत असंत. ही जोडगोळी होती दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांची. विलासराव देशमुख यांच्या निधनाच्या धक्क्यातून मराठवाडा अजून सावरला नाही तोच मंत्रीपदाचे आठ दिवस पूर्ण होण्याआधीच गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची बातमी चटका लावणारी आहे. जुगलबंदीतील दुसर्या तार्यानेही आपल्या मित्रासारखी तशीच एक्झिट घेतल्याने लातूरकर जणू स्तब्ध झाले होते. ३० वर्षे लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे प्रतिनिधीत्व मुंडे यांनी केले. या जिल्ह्यात त्यांचे जिवश्चकंठश्च मित्र होते विलासराव देशमुख. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून या दोघांनी आपाल्या मैैत्रीचा सेतू त्रिकालाबाधित ठेवला. या मैत्रीला कोणाची दृष्ट कधीच लागली नाही. १९९५ ला निवडून युतीचे सरकार आले आणि उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी पराभूत झालेल्या विलासरावांनी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून आपल्या मित्राच्या निवडीचा आनंद साजरा केला होता. साखर कारखानदारीत उतरलेल्या मुंडेंनी विलासरावांना मी कारखाना काढणार असे सांगितले. तर आपल्या कारखान्यांचा एमडी विलासरावांनी मुंडेंना दिला. गोपीनाथ मुंडे यांचा एकदा अंबाजोगाईजवळ अपघात झाला होता तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांनी खास विमान लातूरला पाठवून त्यांना मुंबईला आणले होते. ही मैत्री अधिक खुलायची जेव्हा हे दोघे एकाच वेळी मंचावर असायचे. या दोघांच्या जुगलबंदीने श्रोत्यांच्या हसून मुरकुंड्या वळायच्या, टाळ्या वाजवून हात दुखत आणि दाद देताना डोलावून मानाही. कुणाचा अमृतमहोत्सव असो की पुरस्कार वितरण. दैनिकाचा वर्धापनदिन असो की सार्वजनिक समारंभ. छोट्या-मोठ्या कार्यक्रमालाही हे सारखे एकत्र यायचे, हे विशेष. आणि विलासराव आणि गोपीनाथराव एकत्र आले की असे घडायचेच. हीच बाब मुंडे - छगन भुजबळ, मुंडे - नारायण राणे, मुंडे - सुशिलकुमार शिंदे अशा जुगलबंद्या राज्यातील श्रोत्यांनी अनुभवल्या आहेत. विलासरावांच्या या जिवलग मित्राची एक्झिटही तशीच त्यांच्यासारखी चुटका लावणारी ठरली. त्यांच्या निधनाच्या बातमीने अख्खा महाराष्टÑ सुन्न झाला. विलासरावांसारखीच वय नसताना मिळालेली एक्झिट पाहून आज पुन्हा लातूरकर शोकमग्न झाले आहेत.