संयुक्त मोहिमेस धार हवी

By Admin | Updated: June 29, 2014 00:44 IST2014-06-29T00:38:25+5:302014-06-29T00:44:24+5:30

जालना : शहरातील विविध रस्ते व चौकात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीसोबतच पायी चालणे जिकिरीचे होऊन बसले आहे.

The joint campaign needs a sharp edge | संयुक्त मोहिमेस धार हवी

संयुक्त मोहिमेस धार हवी

जालना : शहरातील विविध रस्ते व चौकात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीसोबतच पायी चालणे जिकिरीचे होऊन बसले आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखा व नगरपालिकेने काही अतिक्रमणे काढली खरी; परंतु दोन दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.
थातूरमातूर अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे काहीही साध्य झाल्याचे दिसत नाही. वाहतूक पोलिस व नगरपालिकेच्या तकलादू धोरणामुळे जनतेचे हाल होत आहेत. शहरातील बहुतांश रस्ते व चौक अतिक्रमणाने अक्षरश: व्यापून गेले आहेत. अनेक वर्षांपासून थाटलेले अतिक्रमण कायमस्वरुपी काढणे नितांत गरजेचे आहे; परंतु या प्रकाराकडे नगरपालिकेसह व वाहतूक पोलिसांचे काडीचेही लक्ष नाही. .
जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले खरे, आठ दिवसांतच परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे. वीर सावरकर चौक, लतिफ शहा बाजार, नूतन वसाहत, बसस्थानक, मामा चौक, सराफा, फुल बाजार, शिवाजी पुतळा, भोकरदन नाका, औरंगाबाद चौफुली, आझाद मैदान, शनि मंदिर चौक रस्ते तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. याचा त्रास सर्व जनतेला होत आहे.
वाहतुकीसाठी रस्ता मोकळा असणे गरजेचे असतानाही अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद बनले आहेत. अनेकदा गर्दीमुळे अपघातही होतात. या भागात अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे सुरूवातीला नागरिकांना काय प्रकार सुरू आहे, हे लक्षात आले नाही. विशेष म्हणजे विक्रेत्यांना अनेकदा सूचना तसेच पत्र देऊनही उपयोग होत नसल्याचे चित्र हमखास पहावयास मिळते. जुना जालन्यातील सर्वात जुनी भाजीमंडई म्हणून बाजार चौकी परिसराची ओळख आहे. मात्र अनेक दिवसांपासून या भागात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे येथे सतत रहदारी ठप्प होते. या अतिक्रमणांचा त्रास रहदारीला तर होतोच, परंतु बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाही होतो
शहरातील अतिक्रमणाकडे प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत आलेले आहे. एक-दोन वेळा ही अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र तेथे पुन्हा अतिक्रमणे थाटण्यात आली. नगरपालिकेने यापूर्वी सदर भागातील अतिक्रमणे हटविण्याचे जाहीर करते. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमणकर्त्यांचे फावत आहे. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
पालिकेकडून ट्रॅक्टर नसल्याचे कारण
नगरपालिकेकडे मनुष्यबळासह साधनांची टंचाई असल्याने अतिक्रमण मोहिमेवर मर्यादा येत आहेत. विशेषत: मलबा वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वेळेस ट्रॅक्टरसह इतर साधने नसल्याने मोहीम अनेकदा स्थगित करावी लागत असल्याचे चित्र आहे.
नगरपालिका अतिक्रमण काढल्यानंतर त्या परिसराकडे ढुंकूनही पाहत नाही. परिणामी, तेथे पुन्हा अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण काढताच तेथे तात्काळ रुंदीकरण करुन रस्ता अथवा पदपाथ निर्माण करण्याची गरज आहे. जेणेकरुन पुन्हा अतिक्रमण करण्याची संधी व्यावसायिकांना मिळणार नाही. नगरपालिकेने विशेष पथकाची स्थापना करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

Web Title: The joint campaign needs a sharp edge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.