छत्रपती संभाजीनगर : पतंगाचा दाेर कापण्याच्या ईर्ष्येतून वापरला जाणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री पोलिस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. एकीकडे अनेक नागरिक यामुळे जखमी होत असताना दुसरीकडे न्यायालयाकडून गांभीर्याने विचारणा होत असल्याने मांजाची विक्री रोखण्यासाठी अचानक रस्त्यावर उतरून कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
गतवर्षी शहरात नायलॉन मांजा म्हणजेच चायनीज मांजामुळे अनेक नागरिक जखमी झाले. यात प्रामुख्याने लहान मुले देखील गंभीर जखमी झाल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांसह महानगरपालिका प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यामुळे संक्रांत जवळ आल्यानंतर पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला होता. १४ जानेवारी संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र, लहान मुले, तरुणांकडून मात्र यंदा नोव्हेंबर महिन्यातच पतंग उडवण्यास सुरुवात झाली होती.
१४ गंभीर घटनांत २० पेक्षा अधिक जखमी२६ ऑक्टोबर रोजी मिलकॉर्नर परिसरात मांजामुळे दुचाकीचालक जखमी झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर जवळपास १४ घटनांमध्ये २० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. २३ डिसेंबर रोजी चंपा चौक परिसरात तासाभरात मांजामुळे ७, तर नारेगावात एक तरुण जखमी झाला.
नायलॉन मांजा विकाल, तर कोठडीत जालशासनाकडून नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे. याचा वापर किंवा विक्री करताना आढळल्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६-१५, ५, भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.) ११०, २२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. यात शहर पोलिसांकडून अटक देखील करण्यात येते. जिन्सी पोलिसांनी अटक केलेल्या मुद्दतसीर अहेमद नजीर अहेमद याला न्यायालयाने नुकतेच दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
दुचाकीस्वारांनी काय काळजी घ्यावी?- दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर केल्यास मांजापासून संरक्षण होते.- स्कॉर्फ, मोठ्या आकाराचा रूमाल बांधूनच घराबाहेर पडावे.- दुचाकीचा वेग कमी ठेवावा. जेणेकरून मांजा अडकला तरी हाताने तत्काळ पकडून बाजूला करता येईल.- दुचाकीच्या हँडलला बांबू किंवा अन्य धातूचे अर्ध गोलाकार गार्ड लावावे.