पैठण : येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह वरच्या धरणातून १६ हजार २३० क्यूसेक्स वेगाने बुधवारी पाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा ९०.१३ टक्के झाल्याने गुरुवारी दुपारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.
आज रोजी जायकवाडी धरणाची पाणी पातळी १५२०.१८ फूट झाली असून, एकूण पाणीसाठा २६९४.७७६ दलघमी झाला आहे. धरणात जिवंत पाणीसाठा १९५६ .६७ दलघमी झाला आहे. मागील वर्षी या दिवशी जायकवाडी धरणात केवळ ७.२३ टक्के पाणी साठा होता. २०१९-२० पासून २०२२-२३ या वर्षाचा अपवाद सोडला तर गेल्या ५ वर्षांमध्ये चौथ्यांदा जायकवाडी धरण भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान, ९० टक्केच्या पुढे पाणीसाठा झाल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करणे बंधनकारक आहे. त्यानुसार गुरुवारी दुपारी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे. त्यानंतर धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. यावेळी. आमदार विलास भुमरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक त्रिमनवार, प्रशासक तथा मुख्य अभियंता सुनंदा जगताप, मुख्य अभियंता अरुण नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे.