- दादासाहेब गलांडे
पैठण (छत्रपती संभाजीनगर) : नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. याचा थेट परिणाम जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यावर झाला असून, ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता ५९ टक्क्यांवर पोहोचली आहे. दरम्यान, धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सध्या धरणात तब्बल ४८,८८९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी धरणात उपयुक्त जलसाठा फक्त ४.०६ टक्के होता, तर यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात साठा ६० टक्क्यांपलीकडे गेला आहे.
महिन्यात २२ टीएमसीची आवकनागमठाण येथून ४४,७५० क्युसेक आणि मधमेश्वर व देवगड बंधाऱ्यांवरून ७,५७१ क्युसेक अशा वेगाने पाण्याची आवक सुरू असून, पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी १५१२.१८ फूट इतकी असून, एकूण साठा १९८१.७७९ दलघमी व जिवंत साठा १२४३.६७३ दलघमी झाला आहे. १ जूनपासून आतापर्यंत जायकवाडी धरणात २२ टीएमसी पाण्याची नोंद झाली आहे.
पूर नियंत्रण कक्षाची स्थापनारविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास १६ हजार २९६ क्युसेकने पाण्याची आवक होत असल्याने जायकवाडी धरणातील ५०.५७ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतरच्या २४ तासांत धरणात ४२ हजार २२३ क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणी पातळी ५४.४५ टक्क्यावर पोहोचली. तर मंगळवारी दुपारी पाणीपातळी ६० टक्क्यांवर आली. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत असून धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने जायकवाडी पाटबंधारे विभाग अलर्ट मोडवर आला असून कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी पूर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षात धरण उपअभियंता श्रद्धा निंबाळकर, शाखा अभियंता मंगेश शेलार, रितेश भोजने, गणेश खरडकर, आबासाहेब गरुड या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.