आजपासून धावणार जनशताब्दी
By Admin | Updated: August 9, 2015 00:10 IST2015-08-09T00:09:58+5:302015-08-09T00:10:07+5:30
जालना : व्यापारीपेठ व उद्योगनगरी असल्याने जालना रेल्वेस्थानकातून जनशताब्दी एक्स्प्रेस सोडावी या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटनांचा सतत पाठपुरावा सुरु होता.

आजपासून धावणार जनशताब्दी
जालना : व्यापारीपेठ व उद्योगनगरी असल्याने जालना रेल्वेस्थानकातून जनशताब्दी एक्स्प्रेस सोडावी या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटनांचा सतत पाठपुरावा सुरु होता. अखेर चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर यश आले असून रविवारी सकाळी ४.४५ मिनिटांनी जालना स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दीला हिरवी झेंडी दाखविला जाणार आहे.
जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबाद येथून सुरु झाली त्या दिवशीपासूनच ही सेवा जालना येथून सुरु करावी, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीसोबतच अनेक प्रवाशांनी केली होती. रेल्वेमंत्र्यांपासून ते दक्षिण व मध्य रेल्वेच्या विविध अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. मात्र रेल्वेनेही निवेदनांची दखल घेतली नाही. जनरेट्यापुढे दक्षिण-मध्य रेल्वेने तीन ते चार महिन्यांपूर्वी रेल्वे सुुरु करण्याचे संकेत दिले. अन् प्रवासी संघटनांचा जीव भांड्यात पडला. काही दिवसांत ट्रॅकसह इतर सर्व सुविधा येथे पूर्ण करण्यात आल्या.
रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी म्हणाले, चार वर्षांपासून आमचा संघर्ष सुरु होता. आज याला यश आले आहे. जालना व्यापारी शहर असल्याने दररोज शेकडो व्यापारी मुंबई येथे जातात. परंतु सोयीची गाडी नसल्याने त्यांना रात्रीच्या गाड्यावर अवलंबून राहावे लागत. रेल्वे संघर्ष समितीने जनशताब्दी सेवा जालना येथून सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
४रेल्वे मंत्र्यांपासून दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, नांदेड परिमंडळाचे व्यवस्थापक यांना वेळोवेळी गाडीची निकड सांगितली. हा विजय आमचा नसून सर्व प्रवाशांचा असल्याचे चौधरी म्हणाले. यासाठी संघटनेतील सुभाष देविदान, फेरोजअली मौलाना, अॅड. विनायक चिटणीस, मनोहर तलरेजा, शीतलप्रसाद पांडे, अशोक मिश्रा, प्रकाश जैन, शीतल तनपुरे, सुरेखा गायकवाड यांनीही भक्कम साथ दिल्याचे चौधरी यांनी सांगितले.
४स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे साईनाथ चिन्नदोरे यांनी या रेल्वेसाठी संघर्ष केल्याचे सांगून प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ही रेल्वे सुरु झाली आहे. मुंबई येथे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
जनशताब्दी जालना स्थानकातून सोडण्यासाठी दक्षिण- मध्य रेल्वेची तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. जालना ते दादर फलक, चार्जिंग पॉइंट, पाण्याची व्यवस्था तसेच बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. शनिवारी दुपारी संपूर्ण ट्रॅकची तपासणी करण्यात आली.
१४ डब्बे असणार
जालना ते दादर हा प्रवास सात तासांत होणार आहे. जनशताब्दी रेल्वेस एकूण १४ डबे आहेत. या दोन वातानुकूलित तर १२ जनरल आहेत. रेल्वेचे आरक्षण पूर्ण झालेले आहे. जालना येथून पहिल्या दिवशी ७२ प्रवासी प्रवास करणार आहेत.