जन्मकुंडली काढताय, मग आरोग्य कुंडली ‘आभा कार्ड’बद्दल उदासीनता का?

By विजय सरवदे | Published: June 30, 2023 07:58 PM2023-06-30T19:58:30+5:302023-06-30T19:58:59+5:30

दीड वर्षात अवघ्या १० टक्के नागरिकांनीच काढले ‘आभा कार्ड’

Janam Kundli is drawn, then why the indifference about health horoscope 'Abha Card'? | जन्मकुंडली काढताय, मग आरोग्य कुंडली ‘आभा कार्ड’बद्दल उदासीनता का?

जन्मकुंडली काढताय, मग आरोग्य कुंडली ‘आभा कार्ड’बद्दल उदासीनता का?

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ‘आभा कार्ड’ अर्थात आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. या हेल्थ कार्डमध्ये आपली सगळी आरोग्याची माहिती डिजिटली ठेवली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने मागील दीड वर्षांपासून कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. पण, जिल्ह्यातील ३७ लाख नागरिकांपैकी आतापर्यंत केवळ १० टक्के लोकांनीच हे कार्ड काढले असून, अजूनही ९० टक्के लोकांनी याबद्दल गांभीर्याने घेतलेले नाही.

हे कार्ड आधार कार्डसारखेच असेल. त्यावर १४ अंकी नंबर असेल. या कार्डच्या माध्यमातून कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला. तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला. कोणत्या टेस्ट करण्यात आल्या. कोणती औषधे देण्यात आली. रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत. तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय, ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाणार आहे. या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची, गोळ्यांची चिठ्ठी सोबत न्यायची गरज पडणार नाही. तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील.

शहरी भागात उदासीनता
ग्रामीण भागात आशावर्कर्स आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत हे कार्ड काढण्याची मोहीम सुरू आहे. शहरी भागात प्रामुख्याने महापालिका, नगरपालिका क्षेत्रात याविषयी मोठी उदासीनता दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या तीन लाख २० हजार नागरिकांनीच हे कार्ड काढले आहे.

कुठे काढले जाते कार्ड
महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्य केंद्रे व आशावर्कर्स, ग्रामीण शहरी भागात (नगरपालिका) ग्रामीण रुग्णालये तसेच ग्रामीण भागात आशावर्कर्स व समुदाय आरोग्य अधिकारी हे कार्ड काढतात. घरीदेखील मोबाइलवर हे कार्ड काढता येते.

आभा कार्ड प्रत्येकाला अनिवार्य
आधार कार्डप्रमाणे आगामी तीन-चार वर्षांत आभा कार्ड प्रत्येक नागरिकांसाठी अनिवार्य असेल. कार्ड काढल्यानंतर तपासणीसाठी तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेलात तर तिथे संबंधित डॉक्टर या कार्डच्या युनिक कोड नंबरवर ट्रीटमेंटची संपूर्ण नोंद करतील. सर्वांनी हे कार्ड काढून घेतले पाहिजे.
- डॉ. अभय धानोरकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

Web Title: Janam Kundli is drawn, then why the indifference about health horoscope 'Abha Card'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.