‘जलयुक्त’ची पावणेदोन हजारावर कामे पूर्ण !
By Admin | Updated: April 15, 2015 00:40 IST2015-04-15T00:36:28+5:302015-04-15T00:40:59+5:30
उस्मानाबाद : वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

‘जलयुक्त’ची पावणेदोन हजारावर कामे पूर्ण !
उस्मानाबाद : वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील २१७ गावांची निवड करण्यात आली असून आजवर २ हजार ३१२ कामे पूर्ण झाली आहेत. यावर सुमारे १४ कोटी २० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, अभियानासाठी उस्मानाबाद तालुक्यातील ३५, तुळजापूर ३९, लोहारा ०७, भूम २२, कळंब ५७, वाशी १६ तर परंडा १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार २१७ गावात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. उपरोक्त गावांमध्ये ३ हजार ५१२ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी १४ एप्रिलअखेर २ हजार ३१२ कामे पूर्ण झाली असून, यावर १४ कोटी २० लाख ४८ हजार रुपयांचा निधी खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये लोकसहभागातून गाळ काढणे २६ कामे, कंपार्टमेंट बंडिग १८३ कामे, शेत तळे ४४, सिमेंट नाला बांध २३, सिमेंट नाला बांध दुरुस्ती १४८, विहीर व बोअर पुनर्भरन ६, नाला खोलीकरण व सरळीकरण २४७, ठिंबक व तुषार सिंचनच्या १ हजार ६२४ कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आणखी १ हजार २०० कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
उस्मानाबाद : जलयुक्त शिवार अभियानातील कामे आराखड्यानुसार सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत. सदरील कामे राबवित असताना कोणत्याही परिस्थितीत दर्जाशी तडजोड करता कामा नये, असे सांगत जी मंडळी दर्जा राखण्याकडे कानाडोळा करेल, त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गतच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, कृषी उपविभागीय अधिकारी, तालुका तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण पाटबंधारे, लघुपाटबंधारे आदी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. काही गावांना भेटी देऊन कामांची पाहणी केली असता काही ठिकाणच्या कामांचा दर्जा राखला नसल्याचे आढळून आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, अभियानामध्ये जिल्हा अव्वल आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कामासोबतच त्याच्या दर्जावरही लक्ष केंद्रित करावे. ज्यामुळे टंचाईग्रस्त गावे कायमस्वरूपी टंचाईच्या जोखडातून सुटतील. यावेळी त्यांनी गावनिहाय कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.