भजनी मंडळांचा मराठा आरक्षणासाठी जागर
By Admin | Updated: January 31, 2017 23:32 IST2017-01-31T23:12:10+5:302017-01-31T23:32:12+5:30
अहमदपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अहमदपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले.

भजनी मंडळांचा मराठा आरक्षणासाठी जागर
अहमदपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अहमदपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. बसस्थानकासमोर ढाळेगावसह परिसरातील भजनी मंडळांनी आरक्षणाच्या मागणीसाठी भजनाचे सादरीकरण करून जागर केला.
सकाळी ९ वाजल्यापासून बसस्थानक परिसरात भजन, भारुड आदी सांप्रदायिक कार्यक्रम सादर करून भक्तिमय वातावरणात आंदोलन झाले. या आंदोलनामुळे शहर व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. शाळा-महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. शहरातील यशवंत विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय, विमलबाई देशमुख कन्या शाळांसह तालुक्यातील शाळा आंदोलनामुळे बंद ठेवण्यात आल्या होत्या.
शिवाजी चौकातही चक्का जाम आंदोलन झाले. मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मुस्लिम बांधवांच्या वतीने आंदोलनकर्त्यांना पाण्याचे पाऊच देण्यात आले. पाणी वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था या कार्यकर्त्यांनी केली होती.