राष्ट्रवादीचे १४ सप्टेंबरला जेलभरो आंदोलन
By Admin | Updated: August 23, 2015 23:44 IST2015-08-23T23:29:36+5:302015-08-23T23:44:34+5:30
जालना : शेतकऱ्यांचा शंभर टक्के साताबारा कोरा करण्यासह चारा छावण्या उभारणे, स्थलांतर रोखण्यासाठी गावातच जुन्या रोहयो पद्धतीने कामे उपलब्ध करुन देणे

राष्ट्रवादीचे १४ सप्टेंबरला जेलभरो आंदोलन
जालना : शेतकऱ्यांचा शंभर टक्के साताबारा कोरा करण्यासह चारा छावण्या उभारणे, स्थलांतर रोखण्यासाठी गावातच जुन्या रोहयो पद्धतीने कामे उपलब्ध करुन देणे या व अन्य मागण्यांसाठी जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १४ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यात जनावरांसह जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश टोपे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांची रविवारी मुंबईत बैठक घेतली. बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळावर उपाययोजना आखण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आला. १४ सप्टेंबरपर्यंत जालना जिल्ह्यात चारा छावण्यासह पाणी सरकारने उपलब्ध करुन न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आ. टोपे म्हणाले, शरद पवार यांनी दोन वेळा मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. दुष्काळाची भीषणता मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूण दिली. याबाबतची दोन निवेदने मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहेत. मात्र, याकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
केवळ बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत चारा छावण्या उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. जालना जिल्ह्यात दुष्काळाचे ढग अधिक गडद होत आहेत. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
येथील जनता नाशिक, पुणे आणि मुंबई परिसरात कायमचे स्थलांतरित होत आहे. ते रोखण्यासाठी गावातच जुन्या रोहयोचीच कामे उपलब्ध करुन द्यावीत, विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क शासनाने भरावे, शेतकऱ्यांची शेतसारा, विजबील व इतर सर्व प्रकारची वसुली थांबवावी या मागण्या राज्य सरकारकडे केल्याचे ते म्हणाले. राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करणाऱ्या राज्य सरकारकडून मात्र, पशुधन वाचविण्याच्या दृष्टीने कुठलीही ठोस उपाययोजना होताना दिसून येत नसल्याची खंत आ. टोपे यांनी व्यक्त केली. बैठकीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)