जय बाबाजी भक्त परिवाराचा आग्रह; शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढणार

By बापू सोळुंके | Published: February 26, 2024 11:53 AM2024-02-26T11:53:27+5:302024-02-26T11:55:14+5:30

याशिवाय जय बाबाजी भक्त परिवार नऊ लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना देणार पाठिंबा, जाणून घ्या इतर लोकसभा मतदारसंघ कोणते आहेत?

Jai Babaji Bhakta Pariwar Urge; Shantigiri Maharaj will contest from Nashik Lok Sabha constituency | जय बाबाजी भक्त परिवाराचा आग्रह; शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढणार

जय बाबाजी भक्त परिवाराचा आग्रह; शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढणार

छत्रपती संभाजीनगर : जय बाबाजी भक्त परिवारांच्या आग्रहावरून नाशिकलोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा स्वत: महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, दिंडोरी, शिर्डी, जळगाव आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांतील चारित्र्यवान उमेदवारांना जय बाबाजी परिवार पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराज म्हणाले की, आपण पहिल्यांदा सन २००९ मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. तेव्हा यश आले नव्हते. राजकारणात चांगली माणसे आली पाहिजेत, अशी आपली भूमिका आहे. ही भूमिका भक्तमंडळींना आवडल्याने त्यांनीच यावर्षी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. नाशिक येथे कुंभमेळा होत असतो, यामुळेच आपण नाशिक मतदारसंघ निवडल्याचे ते म्हणाले.

ही निवडणूक लढविणार आणि जिंकणार आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना दोन्ही गट हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. या पक्षांकडेच का उमेदवारी मागत नाही अथवा तुम्ही तुमचा राजकीय पक्षच का स्थापन करीत नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, मोठ्या राजकीय पक्षांनीच आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी भक्तांची मागणी आहे. त्यांच्या उमेदवारीची अपेक्षा न ठेवता अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तसेच जय बाबाजी परिवार हाच आपला राजकीय पक्ष असल्याचे ते म्हणाले. मागील पंधरा वर्षांत आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी चांगल्या चारित्र्यवान उमेदवारांना पाठिंबा दिला होता. यावर्षीही आपले भक्तगण जास्त असलेल्या आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांवर दबाव टाकण्यासाठी तुम्ही उमेदवारी घोषित केली का असे विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला कोणावरही दबाव टाकण्याची गरज नाही, आम्ही केवळ चांगले लोक राजकारणात यावे, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे शांतिगिरी महाराज म्हणाले. या पत्रकार परिषदेला जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने रविवारी शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात जिल्ह्यातील भक्तांसाठी निवडणुकींच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. स्वत: शांतिगिरी महाराज यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Web Title: Jai Babaji Bhakta Pariwar Urge; Shantigiri Maharaj will contest from Nashik Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.