जाधववाडीत २४ तास भाज्या!
By Admin | Updated: December 22, 2015 23:56 IST2015-12-22T23:32:12+5:302015-12-22T23:56:23+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद राज्यात क्षेत्रफळाने सर्वांत मोठ्या असलेल्या जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आता २४ तास भाजीपाला खरेदी करता येणार आहे.

जाधववाडीत २४ तास भाज्या!
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
राज्यात क्षेत्रफळाने सर्वांत मोठ्या असलेल्या जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आता २४ तास भाजीपाला खरेदी करता येणार आहे. संचालक मंडळाने याचा प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविला आहे. येत्या ३ महिन्यांत या २४ तास सेवेला सुरुवात होईल. शेतकऱ्यांचा शेतीमाल लगेच विकेल व ग्राहकांना ताज्या भाज्या इतर मंडईपेक्षा स्वस्त
मिळतील.
देशभरातून फळे व भाजीपाला येथे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जातो. पंचक्रोशीतील भाज्या शेतकरी रात्रीपासून आणण्यास सुरुवात करतात. पहाटे ४ वाजेपासून येथील अडत बाजार सुरू होतो.
शहरातील भाजीविक्रेते येथून ठोक व किरकोळ भावात भाजीपाला घेऊन जातात. सकाळी ११ वाजेपर्यंत बाजार सुरू असतो. रात्री जे शेतकरी येतात, त्यांना भाजीपाला विक्रीसाठी पहाटेची वाट पाहावी
लागते.
रात्रभर त्यांना भाजीपाल्याची डोळ्यात तेल घालून निगराणी करीत जागावे लागते. सकाळी ११ वाजेनंतर येथे भाजीपाला मिळत नसल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होते. कारण शहरातील भाजीमंडईत मिळणाऱ्या भाजीपाल्यापेक्षा कमी दरात येथे भाजीपाला मिळत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. याचा विचार करून २४ तास भाजीपाला बाजार भरविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात
आला.
संचालक मंडळाने प्रस्ताव मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी पुणे येथील पणन संचालकाकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात कृउबाचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, अडत दुकानाशिवाय भाजीविक्रीसाठी १२ ओटे बांधण्यात आले आहेत. एका ओट्यावर ३६ विक्रेते बसू शकतात.
परवानगी मिळताच येत्या ३ महिन्यांत २४ तास भाजीपाला विक्री सुरू होईल. तेव्हा आणखी ८ ओटे बांधले जातील. आर्किटेक्टकडूनयासंदर्भात ओट्यावर आधुनिक शेड उभारण्यासाठी डिझाईन तयार करून घेतले जात आहे.