रेल्वेस्टेशनवर चहा पिण्यासाठी दररोज लागणार ५ हजार कुल्हड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 20:05 IST2020-12-03T20:03:50+5:302020-12-03T20:05:13+5:30
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वेस्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला

रेल्वेस्टेशनवर चहा पिण्यासाठी दररोज लागणार ५ हजार कुल्हड
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावर यापुढे प्लास्टिक कपाऐवजी ‘कुल्हड’मधून चहा मिळणार आहे. दररोज ५ हजारांच्या जवळपास कुल्हड लागतील. यामुळे पुन्हा रोजगार मिळण्याच्या स्थानिक कुंभार कारागिरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वेस्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. कुल्हड म्हणजे मातीचे बोळके (कप) होय. २००४ ते २००९ दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पहिल्यांदा कुल्हडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती.
जिल्ह्यातील एकूण १० रेल्वे स्थानके आहेत. लॉकडाऊन आधी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर दररोज अडीच ते तीन हजार कप चहा विकला जात होता. अन्य स्थानकातील ८०० ते १००० कप म्हणजे दररोज ५ हजार कप चहा विकत असे. आता कुल्हडमधून चहा देण्यात येणार असल्याने कंत्राटदाराला शहरातून कुल्हड खरेदी करावे लागेल.
स्थानिक कुंभारांना मिळेल रोजगार
लालूप्रसाद यादवांच्या काळात स्थानिक व्यावसायिक दररोज अडीच ते तीन हजार कुल्हड रेल्वे स्टेशनवरील हॉटेलला पुरवत होते. कुल्हड वापरून फेकून दिले जातात. सध्या एक कुल्हड दीड ते अडीच रुपयांदरम्यान मिळतो. यामुळे चहाचे दर वाढविण्याची शक्यता आहे.
अद्याप आदेश अप्राप्त
जालना ते वैजापुरात नोकरी करणारा नोकरदारवर्ग रेल्वेप्रवासात चहा जास्त पितो. रेल्वे प्रवासी कमी चहा पितात. प्रवासी संख्या कमी असल्याने सध्या चहा बंद आहे. अजून कुल्हडमधून चहा देण्याचे आदेश आम्हाला मिळाले नाही.
मजहर खान, हॉटेल व्यावसायिक.
कुल्हड नाही परवडत
एक कुल्हड दीड ते अडीच रुपयांत मिळते. करारानुसार कंत्राटदारला कुल्हडमधून चहा देणे परवडत नाही. चहाचे दर वाढले तर कुल्हडमधून चहा देणे परवडेल.
- अतीश विधाते, चहा विक्रेता