समाजाला विवेकी बनवणे आवश्यक
By Admin | Updated: December 27, 2014 00:47 IST2014-12-27T00:42:24+5:302014-12-27T00:47:37+5:30
औरंगाबाद : प्रत्येकाने विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिकतेचा स्वीकार केला पाहिजे’ असे प्रतिपादन प्रा. श्याम मानव यांनी केले.

समाजाला विवेकी बनवणे आवश्यक
औरंगाबाद : ‘महाराष्ट्राला समाजसुधारक आणि पुरोगामी संतांची मोठी परंपरा आहे. ती स्पष्ट करीत प्रत्येकाने विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिकतेचा स्वीकार आणि प्रचार, प्रसार केला पाहिजे’ असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राज्य शासनाच्या जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव यांनी केले.
राज्य शासनाच्या समाजकल्याण व सामाजिक न्याय विभागातर्फे जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार, प्रसारासाठी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, सहायक आयुक्त जे. एस. एम. शेख, समाजकल्याण अधिकारी समाधान इंगळे, महिला व बालकल्याण सभापती शीला चव्हाण, विजय जाधव, जितेंद्र वळवी, प्रवीण गांगुर्डे, शुद्धोधन तायडे उपस्थित होते. यावेळी आमंत्रित असणारे महत्त्वाचे लोकप्रतिनिधी मात्र गैरहजर राहिले.
प्रा. मानव म्हणाले, ‘प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या तंत्रयुगातही महाराष्ट्रात नरबळींचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते आहे. हा महाराष्ट्र शाहू-फुले आंबेडकरांचा खरोखर आहे का, असा प्रश्न पडतो. इथल्या वारकरी संप्रदायानेही समता आणि वैज्ञानिकता सांगितली. चातुर्वर्ण्याचा दाह कमी केला. लहानपणी अनेक अंधश्रद्धा बाळगणारा मी पुढे समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या सहवासात आलो. केरळचे विज्ञानवादी अब्राहम कोवूर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडला. अंधश्रद्धेला विरोध म्हणजे देवा-धर्मावर टीका, असा अपप्रचार अनेकांनी केला. तो पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचेच या कायद्याने सिद्ध केले आहे.
भारतात अध्यात्माच्याच नावावर बाबा-बुवा फसवणूक करतात. मात्र कुठलेच अध्यात्म विज्ञानाला ओलांडणारे नसते. कायद्याद्वारे दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून बुवाबाजीला स्त्रियाच सर्वाधिक बळी पडत असल्याचे समोर आले आहे. स्त्रियांनी सक्षम बनत असे प्रकार उघडकीला आणण्यात पुढाकार घ्यायला हवा. हा कायदा समजावून सांगण्यास केवळ शासन व अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुरेशी नाही. संविधान व लोकशाहीला सक्षम करणारा हा कायदा सामान्यांपर्यंत पोहोचवत गैरसमज दूर करणे हे सर्व सुशिक्षित व सुजाण लोकांचे कर्तव्य आहे.