अधिक मासात पुरुषोत्तमपुरीला जाणे शक्य नाही; मग शहरात घ्या लक्ष्मी नारायणाचे दर्शन
By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 15, 2023 16:00 IST2023-07-15T16:00:03+5:302023-07-15T16:00:11+5:30
छत्रपती संभाजीनगरात तीन मंदिरात भगवान विष्णू-लक्ष्मीच्या मूर्ती

अधिक मासात पुरुषोत्तमपुरीला जाणे शक्य नाही; मग शहरात घ्या लक्ष्मी नारायणाचे दर्शन
छत्रपती संभाजीनगर : अधिक मासाला १८ जुलैपासून सुरुवात होत आहे. या महिन्यास पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. संपूर्ण भारतात भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर माजलगाव तालुक्यातील क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे आहे. अधिकमासात राज्यभरातील लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. मात्र, ज्या भाविकांना काही कारणास्तव तिथे जाता येत नाही. त्यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ‘लक्ष्मी-नारायणा’चे तीन मंदिर आहेत. या मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल.
हर्सुलमध्ये मंदिर
हर्सुलची ग्रामदेवता हरसिद्धी माता मंदिराच्या लगतच लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. भगवंतांसोबत लक्ष्मीची मूर्ती आहे. काळापाषाणातील या मूर्तींना चांदीचे डोळे बसविण्यात आले आहे. अधिक मासात येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
शिवशक्ती कॉलनीत मंदिर
जालना रोडवर सेंट फ्रान्सिस हायस्कूलसमोर शिवशक्ती काॅलनी आहे. कॉलनीतील प्रवेशद्वारात प्रवेश करताच उजव्या बाजूला ‘लक्ष्मीनारायण मंदिर’ आहे. १९८६ या वर्षी हे मंदिर उभारण्यात आले. येथील लक्ष्मी-नारायणाच्या मूर्ती संगमरवरी आहेत. दोन्ही मूर्तींना दागिन्यांनी मढविले आहे.
काल्डा कॉर्नरला मंदिर
लक्ष्मी-नारायणाचे तिसरे मंदिर काल्डा कॉर्नर येथे बाबा हरदासराम नगरात मुख्य रस्त्यालगतच आहे. येथेही २५ ते ३० वर्षांपूर्वी जयपूरहून लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आणण्यात आली. हर्सूल व शिवशक्ती कॉलनीतील मंदिरापेक्षा येथील भगवंतांची मूर्ती मोठी आहे. भगवंतांच्या चार भुजा असून शंख, चक्र, गदा धारण केलेले आहे. लवकरच या मंदिराचा जीर्णोद्वार होणार असल्याची माहिती मंदिराचे अभ्यासक प्रा. अनिल मुंगीकर यांनी दिली.
लक्ष्मी-नारायणाचे दर्शन घ्यावे
पुरुषोत्तम मास अर्थात धोंड्याचा महिना. या महिन्याला हिंदू धर्मात असाधारण महत्त्व आहे. पुरुषोत्तम म्हणजे भगवान विष्णू होय. पुरुषोत्तमपुरीत मंदिरात फक्त पुरुषोत्तम (भगवान विष्णू)ची मूर्ती आहे.
अधिक मासात दर्शन फलदायी
पुरुषोत्तम मासात तिथे जाऊन भगवंतांचे दर्शन घेण्याला शास्त्रात जास्त महत्त्व देण्यात आले आहे. मात्र, ज्यांना तिथे जाता आले नाही, त्यांच्यासाठी शहरातच भगवंताचे ३ मंदिर उभारण्यात आले आहे. तिन्ही मंदिरात लक्ष्मी-नारायण (भगवान विष्णू-लक्ष्मी) यांची मूर्ती आहे. त्यांचे दर्शन घेतले पाहिजे.
- वे.शा.सं. सुरेश केदारे गुरुजी