इथे घेता येतो खुलेआम झुरका
By Admin | Updated: July 3, 2014 00:57 IST2014-07-03T00:49:43+5:302014-07-03T00:57:03+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम ज्या शासकीय कार्यालयांवर आहे त्या ठिकाणीच शासकीय आदेशाची पायमल्ली केली जात आहे.

इथे घेता येतो खुलेआम झुरका
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम ज्या शासकीय कार्यालयांवर आहे त्या ठिकाणीच शासकीय आदेशाची पायमल्ली केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी कायद्याचा सर्वांनाच विसर पडला असून, शासकीय कार्यालयात खुलेआम झुरका ओढला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कम्पाऊंडच्या आतच चक्क सिगारेटचा स्टॉल थाटला जात असून कर्मचारी, नागरिक कोपऱ्यात उभे राहून झुरक्यावर झुरके ओढत आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा परिषदेतील कॅन्टीनमध्ये सिगारेटची विक्री केली जात आहे. जिल्ह्याचा कारभार ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या ठिकाणचे हे दृश्य, अन्य कार्यालयांची परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही.
सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादन कायदा २००३ मधील कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा दंडनीय अपराध आहे. शासकीय कार्यालयांचा परिसर, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, एसटी स्टँड, रेल्वेस्टेशन, पोलीस स्टेशन, सरकारी दवाखाने, सिनेमागृहे, विश्रामगृहे आदी सार्वजनिक ठिकाणांपासून १०० मीटरपर्यंत धूम्रपान अगर अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करावी, असा आदेश राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी काढला होता. मात्र, याचा विसर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनाच पडला आहे. चक्क शासकीय आदेश धाब्यावर बसवून व्यसन केले जात आहे. आमच्या प्रतिनिधीने जेव्हा काही शासकीय कार्यालयांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली.
मध्यवर्ती बसस्थानक
सार्वजनिक ठिकाणांपैकी चोवीस तास वर्दळीचे ठिकाण म्हणजे मध्यवर्ती बसस्थानक. येथेही १०० मीटर परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे दंडनीय अपराध असतानाही एसटी महामंडळाने बसस्थानकातच पानटपरी चालविण्यास परवानगी दिली आहे. आमच्या प्रतिनिधीने येथे दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान पाहणी केली. या वेळेत १७ सिगारेट, गुटख्याच्या २३ पुड्या विक्री झाल्याचे दिसून आले. सिगारेट विकत घेऊन तेथेच ओढणाऱ्यांमध्ये प्रवासी तर होतेच शिवाय वाहकही होते. खुलेआमपणे झुरक्यावर झुरके मारले जात होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
पर्यटनाच्या राजधानीचे शहर आणि तेथील जिल्हाधिकारी कार्यालय एक आदर्श असायला हवे; पण याच कार्यालयाने धूम्रपान बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. कारण, या कार्यालयात प्रवेश करताच डाव्या बाजूला कम्पाऊंड वॉलच्या आत चहाचा व सिगारेट विक्रीचा स्टॉल आढळून आला. दुपारी १ ते २ वाजेदरम्यान येथे कामासाठी आलेले नागरिक व तीन ते चार कर्मचारी मनसोक्त सिगारेट ओढताना दिसून आले. हे दृश्य पाहून जणू काही शासनाने शासकीय कार्यालयाच्या आवारात धूम्रपान बंदीचा आदेश मागे घेतला की काय, असेच वाटत होते.
भूमी अभिलेख कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीच्या गेटला लागूनच पानटपरी, चहाची टपरी आहे. या प्रबोधिनीमध्ये जाताना प्रवेशद्वारातच तुम्हाला सिगारेट ओढणारे, गुटखा खाणारे नागरिक दिसून येतात. येथेही १०० मीटरच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. दिवसातून अनेक सिगारेटी येथे ओढल्या जातात. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी टपरी हटविण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत, असा प्रश्न येथे उपस्थित होतो.
जि.प. उपाहारगृह
आमच्या प्रतिनिधीने जेव्हा जि.प. परिसराची पाहणी केली तेव्हा उपाहारगृहात कंत्राटदार व काही नागरिक सिगारेट ओढताना दिसून आले. सिगारेट मागताच गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीने लगेच बिनधास्तपणे सिगारेट काढून दिली. जणू काही जि.प. परिसरात धूम्रपानाला परवानगीच दिली आहे, असेच वाटत होते. याशिवाय परिसरातही ग्रामीण भागातून आलेले नागरिक घोळक्यामध्ये कोणी सिगारेट, तर कोणी विडी ओढताना दिसून आले.