शाळेपासून दूर झालेली इशिता पुन्हा शाळेत
By Admin | Updated: July 4, 2017 00:06 IST2017-07-04T00:02:32+5:302017-07-04T00:06:14+5:30
औरंगाबाद :शाळेची फी आणि साहित्याचा खर्च परवडणारा नसल्यामुळे ते शक्य होत नाही, असे इशिताचे आजोबा सांगतात. त्यामुळे लहानग्या इशिताचे शिक्षण थांबले.

शाळेपासून दूर झालेली इशिता पुन्हा शाळेत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आधुनिक जगात प्रगती करण्याचा मूलभूत आधार म्हणजे शिक्षण. म्हणून तर सर्व शिक्षा अभियानासारखे उपक्रम राबवून प्रत्येक मुला-मुलीला प्राथमिक शिक्षण मिळेल याकरिता शासनाचा प्रयत्न सुरू आहे; परंतु गरिबीमुळे अनेक पालकांना मुलांना शाळेत पाठविणे परवडत नाही. सचिन बोरगे यांनादेखील आपल्या मुलीला आर्थिक विवंचनेतून शिक्षण देता येत नव्हते.
त्यांची मुलगी इशिताने गेल्या वर्षी पहिलीमध्ये प्रवेश घेतला. मुलीच्या शैक्षणिक जीवनाची ती सुरुवात होती; परंतु शाळेची फी सचिन बोरगे यांच्या आवाक्याबाहेरची होती. एका कंपनीत कामगार म्हणून काम करताना महिन्याकाठी जेमतेम ७ हजार रुपये हातात पडतात. त्यात मुलीच्या शाळेची ४५०० रुपये फी भरणे परवडणारे नव्हते.
मुलांना शिक्षण देऊन चांगले भविष्य निर्माण करावे, अशी आमची इच्छा आहे; पण शाळेची फी आणि साहित्याचा खर्च परवडणारा नसल्यामुळे ते शक्य होत नाही, असे इशिताचे आजोबा सांगतात. त्यामुळे लहानग्या इशिताचे शिक्षण थांबले. संपूर्ण वर्ष ती शाळेत गेलीच नाही.
इशिता ही केवळ एक उदाहरण आहे. घरातील हलाखीची परिस्थिती, व्यसनाधीन पालक, कौटुंबिक वाद अशा अनेक कारणांमुळे लहान मुलांना शाळेची पायरी चढणे दुरापस्त होते. एक तर पालक अडाणी आणि त्यात गरिबी यामुळे ही मुले शिक्षणापासून दूर राहतात. मग अशी लहान मुले बालमजुरी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांचे बळी ठरतात.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ असूनही अनेक विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. त्यातल्या त्यात शैक्षणिक खर्च व गरिबी यामुळे शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रमाण जास्त आहे. शाळा अर्ध्यावर सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण ही गंभीर समस्या आहे. शाळाबाह्य मुलांचे प्रश्न व समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
इशिताने यंदा मात्र प्रतिभाताई पाटील शाळेत दुसरीमध्ये प्रवेश घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) त्यासाठी पुढाकार घेतला. परिस्थितीअभावी मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना भेटून त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करण्याचा उपक्रम भाजयुमोने हाती घेतला आहे.
या उपक्रमात अध्यक्ष सचिन झवेरी, संग्राम पवार, सागर पाले, शंतनू उरेकर, महेश राऊत, राहुल रोजतकर, शुभम गाडेकर, सतीश राणे आदींनी सहभाग घेतला.
इशिताबरोबरच तिचा लहान भाऊ यशसुद्धा बालवाडीत जाऊ लागला. पहिल्या सहा महिन्यांत इशिताचा पहिलीचा अभ्यासक्र म पूर्ण करण्यात येणार आहे.