४६६ उपायांनंतरही सिंचनाची बोंबच
By Admin | Updated: April 16, 2016 01:35 IST2016-04-16T01:25:17+5:302016-04-16T01:35:18+5:30
हिंगोली : जिल्ह्यात जि.प.च्या लघुसिंचन विभागामार्फत आतापर्यंत बंधारे, तलावांची ४६६ कामे असताना त्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही.

४६६ उपायांनंतरही सिंचनाची बोंबच
हिंगोली : जिल्ह्यात जि.प.च्या लघुसिंचन विभागामार्फत आतापर्यंत बंधारे, तलावांची ४६६ कामे असताना त्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही. चुकीच्या साईट, अपुरे पर्जन्यमान व शेतकऱ्यांची निष्काळजी आदी कारणांमुळे ६३३0 हेक्टरवर सिंचन होत असल्याचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे २0 आहेत. त्यातील अनेकांना गेट नाहीत. त्याची हाताळणी खुद्द लघुसिंचन विभाग करीत नाही. तर शेतकरी त्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट टाकण्याची कवायत करायला तयार नाहीत. यामुळे यावरून होणाऱ्या ४५२ हेक्टर सिंचनाची अपेक्षा फोल ठरत आहे. दरवर्षी नेमकी चार ते पाच गावेच या बंधाऱ्यांना गेट टाकतात.
सिंचन तलावांची संख्या २३ आहे. सेनगावात सर्वाधिक ११ तलाव आहेत. हिंगोली-७, औंढा-३, कळमनुरी-२ अशी इतर तालुक्यांची स्थिती आहे. यातील बोटावर मोजण्याइतके सोडले तर बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा शेती करण्यास सुरुवात केल्याने फारसे उपयुक्त ठरत नाहीत. यातील जुन्या काही तलावांची तर चांगला पावसाळा झाल्यानंतरही योग्य पाणीसाठा होत नसल्याची बोंब आहे. तरीही त्यावर १९२९ हेक्टर सिंचन होते, असा प्रशासनाचा अंदाज आहे. पाझर तलावांची संख्या ५९ आहे. त्यांचीही गत फार वेगळी नाही. यात हिंगोली-१0, सेनगाव-१७, औंढा-११, कळमनुरी-१८ व वसमत-८ अशी तालुकानिहाय स्थिती आहे. यावरून १९८७ हेक्टरला फायदा होतो, असे म्हणने आहे. त्यालाच अप्रत्यक्ष सिंचन असे म्हणायचे. मात्र या तलावांना पाझरच एवढा आहे की, काही ठिकाणी भर पावसाळ्यातही त्यात पाणी दिसत नाही. गावतलाव ७८ आहेत. यात हिंगोली-८, सेनगाव-२३, औंढा-२१, कळमनुरी-१८, वसमत-८ अशी संख्या असून त्याचा फायदा १२१२ हेक्टरला होतो, असा अंदाज आहे. जुन्या पद्धतीतच असलेले काही तलाव वगळले तर अनेक तलाव अतिक्रमणांच्या व पाण्याची चाल बदलण्याच्या नादात भरतच नाहीत. त्यांचाही फारसा फायदा होत असल्याचे चित्र नाही. (प्रतिनिधी)