बांधकामच्या पदोन्नत्यात अनियमितता
By Admin | Updated: July 16, 2014 01:24 IST2014-07-15T23:59:04+5:302014-07-16T01:24:53+5:30
बीड : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदाच्या पदोन्नत्यांत अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला.

बांधकामच्या पदोन्नत्यात अनियमितता
बीड : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदाच्या पदोन्नत्यांत अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले; पण जि.प. प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही हे विशेष़
बांधकाम विभागात २०१२ मध्ये कनिष्ठ अभियंता संवर्गातील पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यात आली होती़ मात्र ही पदे भरताना आयुक्तांची परवानगी घेण्यात आली नाही़ स्थापत्य अभियंता सहायक या पदावरुन कनिष्ठ अभियंता या पदावर पदोन्नती देणे आवश्यक आहे़ परंतु अपंगांचा कोटा दाखवून आंतरजिल्हा बदलीने चार पदे भरण्यात आली़ त्यांना सामावून घेताना बिंदू नामावली, सेवा ज्येष्ठता तपासणे आवश्यक होते़ परंतु त्याला देखील बगल दिल्याचे उघड झाले आहे़
महत्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता या पदाच्या पदोन्नतीसाठी कर्मचारी पात्र होते़ परंतु त्यांना डावलून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती बहाल करण्यात आली़ या संदर्भात आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांना पत्र पाठवले़ बिंदू नामावली नोंद वहीत मागासवर्गीय कक्षाने नोंदविलेल्या अभिप्रायानुसार कारवाई न करणे, पूर्व परवानगी न घेता पदोन्नती कोट्यातील अपंग अनुशेष सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करणे, सरळसेवेच्या कोट्यातील जास्तीत जास्त पदे भरलेली असताना आंतरजिल्हा बदलीने कनिष्ठ अभियंता यांना जि़ प़ मध्ये चुकीने सामावून घेणे, चुकीचा संदिग्ध अहवाल पाठविणे इत्यादीबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जानेवारी २०१४ मध्ये दिले होते़ मात्र सहा महिने उलटूनही कारवाई झालेली नाही़ त्यामुळे अनियमितता करणारे मोकाट आहेत़
याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ आऱ शेंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)
अतिरिक्त अभियंत्यांनाही डावलले
आंतर जिल्हा बदलीने आलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्त्या देताना जवाहर रोजगार योजनेतील अतिरिक्त ठरलेल्या कनिष्ठ अभियंत्यांचाही विचार करण्यात आलेला नाही़ जवाहर योजनेतील अतिरिक्त कनिष्ठ अभियंत्यांना अद्याप सामावून घेतलेले नाही़ त्यांचा परिपूर्ण अहवाल सादर का केला नाही असा सवाल पत्रात आयुक्तांनी विचारला आहे़