गुंतवणूकदारांत धास्ती

By Admin | Updated: July 12, 2014 01:17 IST2014-07-11T23:57:19+5:302014-07-12T01:17:07+5:30

रवि गात, अंबड तीन वर्षात सहापट रक्कम मिळवून देणारी एक कंपनी बंद पडल्याच्या चर्चेने अंबड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Investors scared | गुंतवणूकदारांत धास्ती

गुंतवणूकदारांत धास्ती

रवि गात, अंबड
तीन वर्षात सहापट रक्कम मिळवून देणारी एक कंपनी बंद पडल्याच्या चर्चेने अंबड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दामदुप्पट योजना असलेल्या विविध कंपन्या बंद पडत असताना केवळ आमचीच कंपनी कशी विश्वासपात्र आहे अशा बाता मारणारे कंपनीचे तालुक्यातील व शहरातील अनेक एजंटांचे मोबाईल कव्हरेज क्षेत्राबाहेर गेल्याने गुंतवणूकदारांच्या मनातील संशय बळावला आहे. आपले लाखो रुपये कंपनीबरोबर बुडाल्याच्या संशयाने तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांच्या पोटात पाय शिरले आहेत.
अनेक गुंतवणूकदारांनी कंपनी बुडाल्याच्या चर्चेने अंथरुण पकडले आहे. कंपनीने नेमकी परिस्थिती काय आहे याविषयी लवकरात लवकर अधिकृत भूमिका जाहीर करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
साधारण चार वर्षांपूर्वी गुंतवणुकीच्या सहापट रक्कम मिळवून देणारी एक कंपनी तालुक्यात अवतरली. १७ हजार रुपये गुंतविल्यास अडीच वर्षानंतर १ लाख ५ हजार रुपये परतावा मिळणारी योजना कंपनीने जाहीर केली होती. तसेच ८६ हजार रुपये गुंतविल्यास ३ वर्षानंतर २ लाख ४६ हजार रुपये परत मिळण्याचीही योजना कंपनीने जाहीर केली होती. कंपनीत पैसे गुंतविणाऱ्या गुंतवणूकदारांना या चार वर्षात लाखो रुपयांचा तर एजंटाना कोट्यवधी रुपयांचा नफा मिळाला. तालुक्यातील हजारो नागरिकांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपये या कंपनीत गुंतवले आहेत. यापैकी अनेकांना कंपनीने परताव्याचे धनादेश वाटप केले होते. त्यापैकी बहुतांश धनादेश बँकेत वटले आहेत.
मागील काही काळापासून अनेक गुंतवणूक कंपन्या एकापाठोपाठ बंद पडत आहेत. कमी श्रमात अधिक पैसा हे सूत्र डोळयासमोर ठेवून अंबड तालुक्यात आजपर्यंत अनेक गुंतवणूक योजना अवतरल्या.
यापैकी अनेक योजना फसव्या निघाल्या. मागील काही महिन्यात आदी विविध आॅनलाईन कंपन्या बंद पडल्या आहेत. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या तालुक्यातील हजारो नागरिकांचे कोट्यवधी रुपये या आॅनलाईन गुुंतवणूक कंपन्यांच्या व्यवहारात बुडाले. यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
हे सर्व घडत असताना बाकीच्या गुंतवणूक कंपन्यांपेक्षा कशी विश्वासपात्र कंपनी आहे याचा दावा कंपनीचे एंजट करताना दिसत होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून कंपनीचे व्यवहार थांबविण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहे.
सुरुवातीला आचारसंहितेमुळे व्यवहार बंद असल्याचा दावा कंपनीच्या एंजटांनी केला होता. त्यांनतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे देत एंजटांनी कंपनी सुरक्षित आहे. केवळ तांत्रिक कारणांनी व्यवहार थांबविण्यात आल्याची माहिती गुंतवणुकदारांना दिली. मागील एक आठवड्यापासून कंपनी बुडाली असून तालुक्यातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक बुडाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. (वार्ताहर)
अनेकांनी गुंतविले पैसे...
अंबड शहरासह शिरनेर, वडीकाळया, सुखापुरी, लखमापुरी, वडीगोद्री, गोंदी, जामखेड, राणीउंचेगांव, रोहिलागड, रवना, पराडा, बोरी, दहीपुरी, दुधपुरी, शेवगा, धनगरपिंप्री, ताडहादगांव, मार्डी, बनगांव, झिरपी, भांबेरी, चंदनापुरी, दहयाळा, चुर्मापुरी, नालेवाडी, अंतरवाली सराटी, रुई, भार्डी, घुंगर्डे हादगांव, मठजळगांव, मठपिंपळगाव, चिंचखेड, पिंपरखेड, भालगांव, कुक्कडगांव, कवडगांव, बेलगांव, ढालसखेडा, पांगरखेडा आदींसह तालुक्यातील बहुतांश गावातील सर्वसाधारण नागरिकांसह शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, पोलीस, व्यापारी, शेतकरी, शेतमजुर, कामगार आदींनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यामध्ये केलेली आहे. कंपनी बुडाल्याच्या चर्चेस एकच उधाण आले आहे. चिंतातूर गुंतवणूकदारांनी पैसे परत देण्याची अथवा भूमिका मागणी केली आहे.
गुन्हा दाखल करा
या प्रकरणी संबंधित कंपनीवर तसेच एजंटांवर पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष संतोष जेधे यांनी केली आहे. याविषयी कंपनीविरोधात लवकरच अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा तक्रार देणार असल्याचे गुंतवणूकदार प्रेम रुपवते यांनी सांगितले. सदर प्रतिनिधीने कंपनीची भूमिका जाणून घेण्यासाठी काही एजंटांना फोन लावले असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Investors scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.