गुंतवणूकदार हवालदिल
By Admin | Updated: July 18, 2014 01:45 IST2014-07-18T00:58:06+5:302014-07-18T01:45:15+5:30
परभणी: जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे.

गुंतवणूकदार हवालदिल
परभणी: जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत तीन कंपन्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
अल्प मुदतीत दामदुप्पट, तिप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून मोठ्या रक्कमांची गुंतवणूक करुन घेण्यात आली. गुंतवणूकदारांनी या अमिषाला बळी पडत सुरुवातीला काही रक्कम गुंतवणूक केली. या रक्कमेचा परतावा मिळाल्याने गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला आणि हळूहळू गुंतवणुकदारांची संख्या वाढत गेली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा कंपन्यामध्ये गुंतवणूक करुन फसवणूक झालेले ग्राहक आहेत. मागील काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून दररोज येणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून या विषयी गुंतवणूकदार माहिती करुन घेत आहेत. दररोज फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी संख्या दररोज वाढत आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरही प्रकरणे उघडकीस येत आहेत. अनेक नागरिकांनी स्वत:ची आयुष्यभराची जमा केलेली पुंजी दामदुप्पट रक्कमेच्या लालसेपोटी या कंपन्यांमध्ये जमा केली. काहींनी तर कर्ज काढून, घरातील दागदागिणे मोडूनही गुंतवणूक केल्याचे समोर येत आहे. गुंतवणूकदारांची संख्या मोठी असली तरी तक्रारकर्त्यांची संख्या मात्र कमी आहे.
जिल्ह्यात पीएसपीएस या कंपनीवर सर्वप्रथम गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पाथरी तालुक्यातील पीएमडी कंपनीवर गुन्हा नोंद झाला आणि आता केबीसी कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या सर्व कंपन्यांची उलाढाल कोटींच्या घरात आहे. त्यावरुन फसवणुकीचा आकडा किती मोठा असेल, याचा अंदाज येतो. केबीसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. परभणीसह जिंतूर, पाथरी, सेलू, पालम या तालुक्यांमध्ये अनेक ग्राहकांनी कंपनीत गुंतवणूक केलेली आहे.
जिल्ह्यात १०० हून अधिक एजंट
जिल्ह्यामध्ये केबीसी कंपनीचे शंभरहून अधिक एजंट असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या कंपनीच्या संचालकाविरुद्ध कोतवाली पोलिसठाण्यात एक तक्रार नोंद झाली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे या तक्रारीचा तपास असून पोलिस तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांकडून आवाहन
दरम्यान, केबीसी, पीएसपीएस, पीएमडी या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या व फसवणूक झालेल्या ग्राहकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी केले आहे.
ठेवी परत करा- संभाजी ब्रिगेड
जिल्ह्यात शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बोगस कंपन्यांच्या मालकांना अटक करुन त्यांची मालमत्ता जप्त करावी व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत कराव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात केबीसी, एमआरडी, पीएमडी, सुपर पॉवर, पीएसपीएस, एमआरटी, कॅपझोन, आरएमपी, अल्फा, सक्सेस ट्रेड सर्व्हिसेस, इजी रिचार्ज आदी कंपन्यांनी ठेवीदारांची लुबाडणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच संदर्भात शिवराज्यपक्ष, संभाजी ब्रिगेडने मागील महिन्यात एमआरटी या कंपनीच्या संदर्भात निवेदन दिले आहे. परंतु, यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे कंपनीने हजारो लोकांची फसवणूक करुन पोबारा केला. या सर्व प्रकरणात पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांची मालमत्ता जप्त करुन ठेवी परत कराव्यात, अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, भागवत बोबडे, रहेमान खान पठाण, स्वप्नील स्वामी आदींनी दिला आहे.