अंतर्गत जलवाहिनीचे काम लवकरच

By Admin | Updated: March 29, 2016 00:38 IST2016-03-29T00:26:52+5:302016-03-29T00:38:28+5:30

जालना : शहरातील १२७ कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेला नगर विकास विभागाने सोमवारी मंजुरी दिली असून, या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे.

Internal watering work soon | अंतर्गत जलवाहिनीचे काम लवकरच

अंतर्गत जलवाहिनीचे काम लवकरच


जालना : शहरातील १२७ कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेला नगर विकास विभागाने सोमवारी मंजुरी दिली असून, या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. आ. अर्जुन खोतकर यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव निता राजू लोचन यांची भेट सोमवारी घेतली. त्यानंतर लोचन यांनी निविदा प्रक्रियेस मंजुरी दिली. या निर्णयाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.
जालना शहरातील अंतर्गत जलवाहिन्या जीर्ण झाल्याने तसेच नवीन वसाहतीतही जलवाहिनीअभावी पाणीप्रश्न बिकट झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून हे काम मंजूर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, आ. अर्जुन खोतकर यांनी विशेष पाठपुरावा करत या योजनेसाठी निधी मंजूर करून घेतला.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याची योजना मंजूर करण्यात आलेली आहे. प्रारंभी १७७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. यात शहरात जलमापक बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र तो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने ही योजना १२७ कोटी ६५ लाख रुपयांवर मंजूर करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत शहरातील कादराबाद, रामनगर, चंदनझिरा, नुतन वसाहत, नागेवाडी, नॅशनलनगर, संभाजीनगर, बाजारवाडी (जुना जालना) या भागांत आठ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत.
शहरात ३८१ कि़मी. लांबीची पाणी पुरवठा करणारी वाहिनी विविध भागांत अंथरण्यात येणार आहे. तर जलकुंभ ते अंतर्गत जलवाहिनी यांना जोडणारी ३० कि.मी. लांबीची मोठी जलवाहिनी बसविण्यात येणार
आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत ४८ कोटी ४९ लाख २२ हजार रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया मंजुरीअभावी योजनेची अंमलबजावणी रखडली होती.
यासाठी आ. अर्जुन खोतकर यांनी सोमवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव निता राजू लोचन यांची भेट घेऊन निविदा प्रक्रिया मंजूर करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर लोचन यांनी योजनेची परिपूर्ण माहिती घेत याची निविदा प्रक्रिया तात्काळ मंजूर केली. या निर्णयाने शहरातील अनेक वर्षापासून रखडलेला जलवाहिनीचा प्रश्न निकाली निघणार आहे.
ही योजना मंजूर करण्यापासून ते निविदा प्रक्रियेपर्यंतच्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष घातले तर भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि आ. अर्जुन खोतकर यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Internal watering work soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.