इच्छुक उमेदवारांची टेलरकडे धाव; लिनन, खादीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 07:32 PM2020-03-02T19:32:56+5:302020-03-02T19:35:20+5:30

निवडणुकीसाठी प्रत्येक जण शिवून घेताहेत ड्रेस

Interested candidates run to Tailor; Linen, khadi is in demand | इच्छुक उमेदवारांची टेलरकडे धाव; लिनन, खादीवर भर

इच्छुक उमेदवारांची टेलरकडे धाव; लिनन, खादीवर भर

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या शहरातील काही टेलर आगाऊ बुकिंगमुळे प्रचंड व्यस्त झाले आहेतनिवडणुकीच्या काळात पांढऱ्या रंगातील कॉटन कपड्यांना सर्वाधिक मागणी

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर वॉर्डावॉर्डांतील इच्छुक उमेदवारांनी टेलरकडे धाव घेतली आहे. कडक इस्त्री केलेले खादी, लिननचे ड्रेस परिधान करून हे उमेदवार प्रचारात उतरणार आहेत. प्रत्येक उमेदवार कमीत कमी पाच ड्रेस शिवून घेत आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच उमेदवारांची विविध बाबींची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येते. 

सध्या शहरातील काही टेलर आगाऊ बुकिंगमुळे प्रचंड व्यस्त झाले आहेत. विशेषत: राजकीय नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे कपडे शिवण्यात हातखंडा असलेल्या या टेलरला सध्या खूप भाव आला आहे. कारण महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे. वॉर्डावॉर्डांतून अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत. त्यांना प्रचार करण्यासाठी सकाळी एक, संध्याकाळी एक असे दिवसातून कमीत कमी दोन ड्रेस लागतात. त्यातच उन्हाळा आणि घामामुळे प्रचार फेरीत कपडे लवकर खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त ड्रेस शिवून घेतले जातात.

टेलरने सांगितले की, एक उमेदवार पाचपेक्षा अधिक ड्रेस शिवून घेत आहे. काही उमेदवार असे आहेत की, त्यांनी एकसाथ दहापेक्षा अधिक ड्रेस शिवायला टाकले आहेत. यासंदर्भात टेलर शेख शेरेक यांनी सांगितले की, खास प्रचारासाठी इच्छुक उमेदवार खादी, लिनन कपड्यांना पसंती देतात. खादीमध्ये मिनिस्टर खादी, बंगाल खादी, गांधी खादी, पेपर खादीचा वापर केला जातो.  नेहरू शर्टसाठी लाईटवेट कपडा घेतला जातो. नेहरू शर्टसाठी विविध रंगांतील लिनन कपड्यांना अधिक पसंती दिली जाते. आजकाल राजकीय पक्षानुसार विविध रंगांतील नेहरू शर्टचे कापड घेतले जाते. यात शिवसेना, मनसे, भाजपचे उमेदवार भगवा, केशरी रंगाचा नेहरू शर्ट खरेदी करतात. एमआयएमचे उमेदवार हिरव्या रंगातील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निळ्या रंगाचे नेहरू शर्ट वापरतात. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांढऱ्या रंगाची खादी, लिननच्या नेहरू शर्टला पसंती देतात. राजकीय उमेदवारांसाठी जो नेहरू शर्ट खरेदी केला जातो त्याचा घेरा ३२ इंचांपेक्षा अधिक असतो. त्याला मंत्री घेरा असेही म्हणतात. नॅरो बॉटमचा पायजमा सर्वजण परिधान करतात. मनपाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी एका आमदाराने एकसाथ २३ ड्रेस शिवून नेले. 

पांढऱ्या रंगाला सर्वाधिक पसंती 
राजकीय पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या रंगांतील खादी, लिननचे नेहरू शर्ट, पायजमा खरेदी करणे पसंत करीत असतात. मात्र, प्रचारात एक ते दोन ड्रेस पांढऱ्या कॉटनचे असावे ही त्यांची इच्छा असते. यामुळे निवडणुकीच्या काळात पांढऱ्या रंगातील कॉटन कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. कपडे रेडिमेड घेण्याऐवजी शिवून घेण्यावर उमेदवारांचा भर असतो. 

Web Title: Interested candidates run to Tailor; Linen, khadi is in demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.