सव्वालाख शेतकऱ्यांना व्याज सवलत
By Admin | Updated: June 27, 2014 00:10 IST2014-06-26T23:10:27+5:302014-06-27T00:10:18+5:30
बीड: शेतीसाठी पीककर्ज घेऊन वेळेवर भरणाऱ्या तब्बल १ लाख ३६ हजार ६५४ शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे.

सव्वालाख शेतकऱ्यांना व्याज सवलत
बीड: शेतीसाठी पीककर्ज घेऊन वेळेवर भरणाऱ्या तब्बल १ लाख ३६ हजार ६५४ शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे. यापोटी तब्बल १४ कोटी रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.
बियाणे खरेदी, मशागत तसेच पेरणी आदी शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅँक, खाजगी बॅँक तसेच सहकारी बॅँकांकडून पीककर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात पीककर्ज देण्यात येते.
एक लाखापर्यंत पीककर्ज बिनव्याजी देण्यात येते. शेतकऱ्यांना सुरुवातीला कर्जाची रक्कम भरावी लागते, मात्र नंतर व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना परत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत शुन्य टक्के तर तीन लाखांपर्यंत अवघे १ ते ३ टक्के दराने कर्ज मिळते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, महाराष्ट्र ग्रामीण बॅँक व राष्ट्रीयकृत बॅँकांमध्ये ज्या शेतकऱ्याने मुदतीत कर्जफेड केली, त्यांना या सवलतीची फायदा मिळाला आहे. यामध्ये डीसीसीच ९१ हजार ९४६, महाराष्ट्र ग्रा. बॅँकेच्या १६ हजार ८९१, राष्ट्रीयकृत बॅँकेतून २७ हजार ८१७ शेतकऱ्यांना या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे.
या शेतकऱ्यांना तब्बल १४ कोटी रुपये व्याज सवलत योजनेंतर्गत मिळालेले आहेत. यातील जिल्हा नियोजन समितीतून ८ कोटी तर राज्य शासनाकडून ६ कोटी रुपये मिळाले असल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.
अनेकदा शेतकरी बॅँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यास टाळाटाळ करतात, यामुळे शेतकऱ्याचेच नुकसान होते. जे शेतकरी वेळेत कर्जफेड करताता त्यांना या योजनेंतर्गत लाभ मिळत असल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.
आणखी नऊ कोटींची तरतूद
या योजने संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम म्हणून १४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या याजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी नऊ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. (प्रतिनिधी)