१ ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवास सुरू होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:04 IST2020-07-22T20:03:33+5:302020-07-22T20:04:10+5:30
शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांना सव्वालाख ई-पास

१ ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवास सुरू होण्याची शक्यता
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये देशातील विविध भागांतील नागरिक औरंगाबादमध्ये अडकले होते. त्या अडकलेल्या १ लाख २५ हजार नागरिकांना जिल्हा प्रशासनाने परवाना (ई-पास) मंजूर करून त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली असून, १ ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवास सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
शहरात १८ जुलैपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीनंतर ग्रामीण, शहरी भागात व्यवहार सुरू झाले तरी जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी अद्यापही नागरिकांना प्रशासनाकडून ई-पास घ्यावा लागतो. २ एप्रिलपासून दररोज दोन हजारांवर पास मंजूर करण्यात आले. आता हे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, रेल्वे आणि बसने २५ हजारांहून अधिक नागरिक पाठविले. ३१ जुलैनंतर राज्य शासन लॉकडाऊनमध्ये काही सवलती देईल, त्यामध्ये आंतरजिल्हा प्रवास करण्याची मुभा मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
२० जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाने १ लाख २५ हजार नागरिकांना पास मंजूर केले. जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये मजूर, प्रवासी, पर्यटक, उद्योजक, विद्यार्थी, व्यापारी अडकले होते. त्यांना पास देऊन पाठविण्यात आले. आता जिल्ह्यातील नागरिक विविध कामांसाठी जिल्ह्याबाहेर, शेजारच्या जिल्ह्यात जाण्यासाठी अर्ज करीत आहेत.
३५ हजार अर्ज नामंजूर
२० जुलैपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठी केलेल्या अर्जांपैकी तब्बल ३५ हजार अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. कागदपत्रांची कमतरता असल्यामुळे अर्ज नाकारण्यात आले आहेत. सध्या सुमारे २ हजार १०० पास मंजुरीविना पडून आहेत. पाससाठी आवश्यक सेवा, कारण, उद्देशाची शहानिशा करूनच मंजुरी देण्यात येते.