जानकारांविरुद्ध तीव्र असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 01:08 IST2016-10-13T00:36:54+5:302016-10-13T01:08:17+5:30
औरंगाबाद : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

जानकारांविरुद्ध तीव्र असंतोष
औरंगाबाद : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जानकरांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी आणि बुधवारी शहरात ठिकठिकाणी जानकरांच्या पुतळ्याला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.
भगवानगड येथे जानकर यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी सकाळी बजरंग चौकात जानकर यांच्या पुतळ्याला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक देशमुख, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल तायडे, शहर कार्याध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल, राजेश पवार, अय्युब खान, सोपान खोसे, वीणा खरे, अनुपमा पाथ्रीकर, मोतीलाल जगताप, विठ्ठल जाधव, विनोद बनकर, सीमा थोरात, लता पाटील, भाऊसाहेब टिके, विजय म्हस्के, सुनील ठाकरे, निवृत्ती मांडकीकर, कैलास कुंठे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जानकर यांनी वापरलेल्या हीन आणि शिवराळ भाषेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील, असा इशारा कोकाटे यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी जानकर यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
पडेगाव येथेही युवक काँग्रेस तसेच अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या पुतळ्याला जोडे मारा आंदोलन केले व पुतळा जाळला. पवार आणि मुंडे यांच्याविषयी जानकर यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी शेख कय्युम, शेख मेहबूब, शेख इस्माईल राजा, इम्रान पठाण, यासेर खान, झुबेर खान, मुसेफ कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मंगळवारी रात्रीही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिडको उड्डाणपुलाखाली जानकरांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्ता भांगे, अमित भांगे, सतीश कुबडे, रंगा खाडे, किरण गवई, संतोष शेप, गणेश नागरे, मारुती पाटील आदी कार्यकर्त्यांनी सिडकोतील वसंतराव नाईक चौकात जानकर यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पुतळा दहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करून जानकरांच्या पुतळ्याला चपला, बूट मारून निषेध व्यक्त केला.