‘आशा’ करणार शौचालयांची पाहणी
By Admin | Updated: March 22, 2016 01:13 IST2016-03-22T00:10:46+5:302016-03-22T01:13:11+5:30
जालना : शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. या अंतर्गत नगर पालिकेकडून अनुदान वाटपाचे काम सुरू आहे.

‘आशा’ करणार शौचालयांची पाहणी
जालना : शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. या अंतर्गत नगर पालिकेकडून अनुदान वाटपाचे काम सुरू आहे. लाभार्थींनी केलेल्या कामाची तपासणी तसेच सर्व्हेक्षणाचे काम आता आशा सेविका करणार आहेत. सोमवारी पालिकेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात १० हजारपेक्षा जास्त शौचायले बांधण्यात येणार आहेत. यापैकी काही लाभार्थींनी पन्नास टक्के शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. या अंतर्गत शहरातील ४ हजार ६९१ लाभार्थींना सहा हजार रूपयांप्रमाणे २ कोटी ७६ लाख रुपयांचे वाटप आत्तापर्यंत करण्यात आले आहे. सोमवारी शौचालय बांधकामासाठी आढावा घेण्यासाठी सोमवारी मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेऊन स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने तसेच इतर कामांचा व्याप असल्याने या अभियानात आशा वर्कर्स यांनी शौचालय कामांची पाहणी करून संबंधितांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांनी आशा वर्कर्स यांना दिल्या.(प्रतिनिधी)
शहराचा विस्तार पाहता जालना पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना शौचालय बांधकामाचे नियोजन करणे अवघड होत आहे. त्यामुळे आशा वर्कर्स कडून सर्व्हेक्षण, तपसणी तसेच या संबंधित इतर कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे या अभियानात पारदर्शकता आणण्यासोबतच शहर स्वच्छ करण्याचा मानस असल्याचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले.
याविषयी मुख्याधिकारी पुजारी म्हणाले की, शहराचा विस्तार मोठा असल्याने आशा वर्कर्सची मदत घेण्यात येणार आहे. आत्तापर्यंत लाभार्थींनी ५० टक्के शौचालयांची कामे पूर्ण केली आहेत. येत्या काही दिवसांत बहुतांश नागरिक शौचालयाचे काम पूर्ण करतील, असा विश्वास आहे. नगर पालिकेकडून याद्या लावण्यात आल्या आहेत. सर्व ते सहकार्य करण्यात येत आहे. जालना शंभर टक्के हगणदारीमुक्त होईल.