‘छावणी’च्या निवडणूक खर्चाची चौकशी
By Admin | Updated: April 7, 2015 01:29 IST2015-04-07T01:14:41+5:302015-04-07T01:29:25+5:30
औरंगाबाद : औरंगाबादेत छावणी परिषदेच्या निवडणुकीवर अहमदनगरपेक्षा तब्बल सातपट जास्त खर्च करण्यात आला आहे.

‘छावणी’च्या निवडणूक खर्चाची चौकशी
औरंगाबाद : औरंगाबादेत छावणी परिषदेच्या निवडणुकीवर अहमदनगरपेक्षा तब्बल सातपट जास्त खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे परिषदेच्या सर्वच नगरसेवकांनी या खर्चावर जोरदार आक्षेप घेऊन यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. तसेच उधळपट्टी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही केली. त्यावर ब्रिगेडिअर मनोजकुमार यांनी निवडणूक खर्चाबाबत सखोल चौकशीचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्यापासून पुढील काही दिवस दररोज छावणी परिषदेच्या बैठकीत खर्चाच्या प्रत्येक बाबीवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
छावणी परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. या निवडणुकीवर छावणी परिषद प्रशासनाने तब्बल ४४ लाख ७२ हजार रुपये खर्च केले. नवनिर्वाचित सदस्यांनी या खर्चावर आक्षेप घेतल्यामुळे ब्रिगेडिअर मनोजकुमार यांनी आज परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. सभेला उपाध्यक्ष किशोर कच्छवाह यांच्यासह सर्वच नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक मिर्झा रफत बेग आणि प्रशांत तारगे यांनी
मुख्याधिकारी विनीत लोटे निवडणूक काळात बरेच दिवस रजेवर होते. त्यांच्या गैरहजेरीत कार्यालयीन अधीक्षिका वैशाली केणेकर आणि लिपिक शेख साजिद यांच्या देखरेखीखाली निवडणुकीचा खर्च झाल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर केणेकर यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी समिती नेमण्यात आली होती, असा खुलासा केला. तेव्हा समितीतील इतर सदस्यांकडे त्याविषयी विचारणा करण्यात आली.
२मात्र, संबंधित सदस्य कर्मचाऱ्यांनी आमची भूमिका कोटेशन मंजुरीपुरतीच मर्यादित होती, असे सांगून हात वर केले. सुरुवातीला वाहन आणि मंडप नियोजनाची जबाबदारी स्वच्छता निरीक्षक बन्सीले यांच्याकडे सोपविण्यात आली होती, मग लिपिक साजिद शेख यांनी हे काम कसे केले, असा सवालही नगरसेवकांनी उपस्थित केला.
नगर छावणी परिषदेच्या निवडणुकीत वाहनांवर अवघा १२ हजारांचा खर्च झाला. हा खर्च औरंगाबादेत १० लाख २९ हजार झाला. त्याचप्रमाणे तेथे मंडपावर अवघे ६० हजार रुपये खर्च झाले. औरंगाबादेत मात्र, प्रशासनाने मंडपावर तब्बल १५ लाख ३९ हजारांचा खर्च केला आहे. याचप्रमाणे इतरही बाबींमधील अफाट तफावत नगरसेवकांनी सभागृहासमोर मांडली.