नोटीस काढणाऱ्या गृहपालांची चौकशी

By Admin | Updated: January 6, 2015 01:13 IST2015-01-06T00:49:51+5:302015-01-06T01:13:07+5:30

औरंगाबाद : देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी लढू नका, जे मिळत आहे ते घ्या आणि गप्प बसा; अन्यथा प्रवेश रद्द होईल,

Inquiries of the Home Office seeking notice | नोटीस काढणाऱ्या गृहपालांची चौकशी

नोटीस काढणाऱ्या गृहपालांची चौकशी


औरंगाबाद : देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी लढू नका, जे मिळत आहे ते घ्या आणि गप्प बसा; अन्यथा प्रवेश रद्द होईल, असा दम देणाऱ्या शासकीय मुलांच्या वसतिगृहाच्या गृहपालांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी दिली.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाप्रमाणे एकही सेवा-सुविधा देण्यात येत नाही. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी गृहपाल, समाजकल्याण आयुक्त आणि मंत्रालयापर्यंत निवेदने दिली; पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यामुळे १ जानेवारी रोजी पुन्हा समाजकल्याण सहायक आयुक्तांना २६ जुलै रोजीच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर कारवाई करावयाची सोडून किलेअर्क येथील शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी जे विद्यार्थी रॅली, मोर्चा अथवा उपोषण करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस लावली होती. मनमानी नोटीस काढल्याचे वृत्त लोकमतने ५ जानेवारी रोजी हॅलो औरंगाबादमध्ये प्रकाशित केले होते.
याविषयी सहायक समाजकल्याण अधिकारी मडावी म्हणाले की, नोटीस काढल्याची विचारणा संबंधितांना करण्यात आली आहे. उपोषण करू नका अशी नोटीस काढता येत नाही. गृहपाल वैशाली बागूल आणि शरद वाघमारे व इतरांनी काढलेल्या नोटीस आणि निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईत. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा केली आहे. उद्या प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त आणि सहायक आयुक्त विद्यार्थ्यांना भेटणार आहेत.
विद्यार्थ्यांची मनधरणी
विद्यार्थ्यांनी उपोषणाला बसू नये म्हणून सोमवारी दिवसभर उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची मनधरणी करण्यात येत होती. वसतिगृह निरीक्षक साळवे, सहायक समाजकल्याण अधिकारी यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी उपोषण सोडण्यास तयार नसल्यामुळे अखेर पोलिसांचा दबाव आणण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.

Web Title: Inquiries of the Home Office seeking notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.