महागाईचा भडका; निवडणुका संपताच पेट्रोलपाठोपाठ डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 12:49 IST2021-05-14T12:48:28+5:302021-05-14T12:49:20+5:30
पश्चिम बंगालसह अन्य ४ राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि इंधनात थांबलेल्या भाववाढीने पुन्हा उसळी घेतली.

महागाईचा भडका; निवडणुका संपताच पेट्रोलपाठोपाठ डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर
औरंगाबाद : पेट्रोलचे दर ९९.६६ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. शंभरी गाठण्यासाठी अवघे ३४ पैसे बाकी आहेत. त्यापाठोपाठ डिझेलचे भावही शतकाकडे वाटचाल करीत असून, गुरुवारी ९१.०५ रुपयांनी विकले जात होते.
पश्चिम बंगालसह अन्य ४ राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि इंधनात थांबलेल्या भाववाढीने पुन्हा उसळी घेतली. १८ जानेवारी रोजी पेट्रोल ९२.७७ रुपये, तर डिझेल ८३.०८ रुपये प्रतिलिटर विकत होते. ६ मे रोजी पेट्रोल ९८.६३, तर डिझेल ८९.७८ रुपये प्रतिलिटरने विक्री झाले. आता पेट्रोलमध्ये भाववाढीचे शतक गाठण्यासाठी अवघे ३४ पैसे बाकी आहेत. येत्या एक - दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयेप्रमाणे विक्री होईल. तसेच पॉवर पेट्रोलने याआधीच शंभरी गाठली आहे. गुरुवारी १०३.१२ रुपये प्रतिलिटर विकले जात होते. डिझेल १०० रुपये होण्यासाठी अजून ८ रुपये ९५ पैसे बाकी आहेत. यामुळे येत्या काळात महागाई आणखी वाढणार, असे संकेत व्यापाऱ्यांनी दिले.
भाववाढ सरकारच्या मनावर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग होत असल्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या होत्या. निवडणुका पार पडताच आता भाववाढ सुरू केली आहे. हा सर्व खेळ केंद्र सरकारचा आहे. त्यांच्या आदेशानुसार तेल उत्पादक कंपन्या भाव वाढवतात किंवा स्थिर ठेवतात, असे वाहनधारकांनी सांगितले.