कुख्यात बोक्या स्थानबद्ध
By Admin | Updated: November 16, 2014 00:02 IST2014-11-16T00:02:06+5:302014-11-16T00:02:06+5:30
औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांत गुन्हेगारी कारवाया करणारा कुख्यात गुंड बोक्या ऊर्फ मोहंमद अनिस (रा. क्रांतीचौक) यास पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी आज हर्सूल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले

कुख्यात बोक्या स्थानबद्ध
औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांत गुन्हेगारी कारवाया करणारा कुख्यात गुंड बोक्या ऊर्फ मोहंमद अनिस (रा. क्रांतीचौक) यास पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी आज हर्सूल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृक- श्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा अधिनियम १९८१ चे कलम (१) अर्थात (एमपीडीए अॅक्ट १९८१) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
मोहंमद अनिस ऊर्फ बोक्या याच्या विरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात चोरी करणे, जबरी चोरी, अवैैध शस्त्र बाळगणे, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी दखलपात्र ६ गुन्हे दाखल आहेत. तो आपल्या दहशतीच्या जोरावर क्रांतीचौक परिसर, भोईवाडा, समर्थनगर येथील रहिवाशांकडून खंडणी वसूल करीत असे, मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशांना लुटमार करीत होता. त्याच्या या गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी त्यास २०१२ मध्ये औरंगाबाद शहरातून तडीपार केले होते. तडीपार असतानाही तो शहरात येऊन गुन्हेगारी कृत्य करीतच होता. उलट त्याच्या गुन्ह्यांचा आलेख चढतच असल्याने ही कारवाई करण्यात आली.