अपात्र गाईडकडील संशोधक अधांतरी
By Admin | Updated: June 13, 2014 01:11 IST2014-06-13T00:58:06+5:302014-06-13T01:11:13+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अपात्र ठरविलेल्या ३८ पीएच.डी. गाईडस्चे भवितव्य आता अधांतरी लटकले आहे.

अपात्र गाईडकडील संशोधक अधांतरी
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अपात्र ठरविलेल्या ३८ पीएच.डी. गाईडस्चे भवितव्य आता अधांतरी लटकले आहे. त्या गाईडस्च्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या संशोधनाचे काय, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केली त्यांचे काय, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने मात्र अपात्र गाईडस्शी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय बोर्ड आॅफ युनिव्हर्सिटी टीचर्स अँड रिसर्च (बीयूटीआर) कमिटी घेणार असल्याचे सांगितले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जाहीर केलेल्या पीएच.डी. गाईडस्च्या पात्रतेसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर विद्यापीठाने गेल्यावर्षी चौकशी समितीमार्फत सर्व गाईडस्च्या शैक्षणिक पात्रतेची तपासणी केली. त्यात ३८ प्राध्यापक गाईडशिपसाठी विद्यापीठाच्या नियमांनुसार अपात्र असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून विद्यापीठाने त्यांची गाईडशिप रद्द केली. यातील काही गाईडकडे पाच ते सहा वर्षांपासून दरवर्षी सरासरी ८ विद्यार्थी पीएच.डी. संशोधन करीत आहेत. अशा प्रकारे सर्व गाईडस्कडे सुमारे २५० विद्यार्थी संशोधन करीत होते. त्या प्राध्यापकांना अपात्र गाईड म्हणून ठरविण्यात आल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी लटकले.
नवनियुक्त कुलगुरू याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निर्णयाकडे लागले लक्ष
या विद्यार्थ्यांनी सतत प्रशासनाकडे त्यांच्या पीएच.डी.विषयी काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी विद्यापीठ आणि महाविद्यालय मंडळाचे संचालक डॉ. एस.पी. झांबरे यांना विचारले असता ते म्हणाले की, अपात्र गाईडकडे नोंदणी झालेल्या पीएच.डी. विद्यार्थ्यांचा निर्णय आता बीयूटीआर कमिटी घेईल. या कमिटीचे अध्यक्ष कुलगुरू असतात.